मंगळवेढा प्रांत कार्यालयाचा पदभार नव्या अधिकाऱ्याकडे
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- मंगळवेढा येथे प्रांताधिकारी म्हणून वादग्रस्त ठरलेले प्रांत अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्या जागी सांगलीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी.आर. माळी यांच्या नियुक्तीचे आदेश अव्वर सचिव सुरेश नाईक यांनी आज पारित केले.
मंगळवेढा येथे झालेल्या प्रांत कार्यालयात आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांनी कामातून ठसा उमटवला मात्र काही महिन्यापूर्वी आलेले प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर यांच्या कार्यकाळात नागपूर- रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचा मोबदला वाटण्यावरून मंगळवेढा व सांगोला या दोन तालुक्यातून अनेक तक्रारी झाल्या. त्यामध्ये तक्रारदारांना योग्य वागणूक न देणे, अपशब्द वापरणे याशिवाय मोबदल्यासाठी आडवणूक करणे अशा प्रकारच्या घटना घडल्याच्या तक्रारी महसूल मंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे केल्या होत्या. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांच्या नेतृत्वाखाली 26 दिवस प्रांत कार्यालयासमोर आंदोलन केले. तर सांगोला तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या भूसंपादकाचा मोबदला देण्यावरून तलाठी सुरज नळे यांचे लाच प्रकरण उघडकीस आले. मोबदला देण्यावरून बाधित शेतकऱ्याकडून टक्केवारीतून कोट्यावधीची माया जमवली. नळे प्रकरणात लाच लुचपत पथकाने प्रांत अधिकाऱ्यांच्या सर्व व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे संजय गेजगे यांनी तक्रार करत दस्तरखुर्द सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचे सांगत मुंबई येथे प्रांतधिकाऱ्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. एकूणच मंगळवेढ्याचे प्रांत अधिकारी,व कार्यालय राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या प्रकरणात तंबी दिली होती.आज बी.आर.माळी यांची मंगळवेढा येथे प्रांताधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश निघाले आहेत.बी.आर.माळी यांनी मंगळवेढा येथे 2008 ते 2011 या कालावधीत तहसीलदार म्हणून उल्लेखनीय काम केलेले. त्यामुळे मंगळवेढा प्रांत कार्यालयाला पुन्हा एकदा कार्यक्षम अधिकारी मिळाल्याने तालुक्यातील नागरिकांतून आनंद व्यक्त केला जात आहे.
.png)
0 Comments