आत्महत्येस जबाबदार संबधीतांवर सखोल चौकशीअंती गंभीर गुन्हे दाखल करा - संभाजी आरमार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील रहिवाशी मयत हणमंत विठ्ठल काळे (वय ३६) हे चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेत शिपाई या पदावर कार्यरत होते. मागील तेरा वर्षांपासून चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेत विनावेतन कार्यरत शिपाई हणमंत काळे हे त्यांची पत्नी व तीन लहान चिमुकल्यांसह आपल्या कुटुंबासमवेत वेतन आजनाहीतर उद्या मिळेल यासाठी अखंड प्रयत्न करत उदरनिर्वाह करत होते. सध्याचा महागाईचा काळ पाहता वेतन चालू करण्यासाठी सतत प्रयत्न करणारे हणमंत संबंधित शिक्षण विभागाकडे शालार्थ आयडी मिळवण्यासाठी चकरा मारत होते. तेरा वर्ष विनावेतन काम करून घेणारे संस्थाचालक व न्यायालयीन आदेशाचा अवमान करत शालार्थ आयडी वेळेत उपलब्ध न करून देणारा शिक्षण विभाग यांनी हणमंत काळेंची उघडपणे अडवणूक, उपाहसना, मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्राथमिक निदर्शनास येत आहे. खोट्या आश्वासनांवर तुटपुंजे वेतन आणि विनावेतनवर कार्य करून घेणाऱ्या संस्थाचीही काही कमतरता नाही. शिक्षक असोत अथवा कर्मचारी नोकरीवर ठेवण्यासाठी, कायम करण्यासाठी काही संस्थाचालक नियमबाह्य पद्धतीने लाखोंच्या देणग्या व लाच घेतात अशी प्रकरणे अजूनही आसपास आढळतात.
त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील लाचखोरी, अडवणूक आणि भ्रष्टाचार यापूर्वी एका जागतिक दर्जाच्या पुरस्कृत शिक्षकासह जनतेचा अनुभव जगजाहीर आहे. हणमंत काळे यांची ह्याच बकाल, निर्ढावलेल्या, असंवेदनशील व्यवस्थेने हत्त्या केली असे म्हणणे चुकीचे, वावगे ठरणार नाही. मृत्यूनंतर तेरा वर्षाचा पगार आणि पत्नीस नौकरी देणे हा मानवतेच्या दृष्टिकोनातून पूर्ण न्याय नसून त्यांच्या लहान लेकरांच्या बापाचा ह्या कठोर व्यवस्थेने घेतलेला बळी अविस्मरणीय व मानवतेला काळिमा फासणारा आहे. संपूर्ण कुटुंबियांसह आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या व हणमंत ह्यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर योग्य ती कारवाई होऊन कठोर शिक्षा करावी आणि त्यांच्या पत्नी आणि मुलांच्या उत्तम भविष्यासाठी शासनाने तातडीने तजवीज करावी ही जनभावना सर्वसामान्यांतून मागणी रूपाने होत आहे.
तरी हणमंत काळे यांच्या आत्महत्येस जबाबदार संबंधितांची सखोल चौकशी करून गंभीर गुन्हे दाखल करावेत आणि अशा दुर्दैवी घटना परत होणार नाहीत ह्याची योग्य ती खबरदारी घ्यावी अन्यथा सर्वसामान्यांच्या हितासाठी तसेच मानवतेच्या रक्षणासाठी संघटनेला सनदशीर मार्गाने उग्र आंदोलन करावे लागेल याची योग्य ती दखल घेण्याचे निवेदन जिल्हाधिकारी नवीन आशीर्वाद यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे, जिल्हा संघटक अनंतराव नीळ, विद्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के, प्रभाग प्रमुख राजाभाऊ रच्चा, रेवणसिद्ध कोळी, मल्लिकार्जुन पोतदार, सागर दासी व नवनाथ मस्के आदीजण उपस्थित होते.
0 Comments