Hot Posts

6/recent/ticker-posts

प्लसमध्ये आलेल्या उजनीतून सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे एक आवर्तन द्यावे मोहोळ माढा आणि करमाळ्याच्या तिन्ही आमदारांचे उपमुख्यमंत्र्यांना संयुक्त साकडे माजी आमदार राजन पाटील यांचाही शिष्टमंडळात समावेश

 प्लसमध्ये आलेल्या उजनीतून सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे एक आवर्तन द्यावेमोहोळ माढा आणि करमाळ्याच्या तिन्ही आमदारांचे उपमुख्यमंत्र्यांना संयुक्त साकडे माजी आमदार राजन पाटील यांचाही शिष्टमंडळात समावेश


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- पावसाळ्यातील ऑगस्ट महिना निम्मा सरत आला आहे. तरीही सोलापूर जिल्ह्यात वरुणराजाने म्हणावी तशी हजेरी लावली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजना बरोबर शेती सिंचनाचा प्रश्न देखील बिकट झाला आहे. सध्या उजनी धरण प्लसमध्ये आल्यामुळे उजनी धरणातील उपलब्ध पाणी साठ्यातून दोन्ही कालव्याला आणि सीना जोड कालव्याला एक पाण्याचे आवर्तन द्यावे. अशी मागणी माजी आमदार राजन पाटील,माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, आमदार यशवंत माने यांनी एकमुखाने राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.
काल मुंबई येथे अजितदादा पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेतेमंडळीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उभय नेत्यांमध्ये अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर सध्याच्या पाणी प्रश्नाबद्दल मोहोळ माढा आणि करमाळ्याच्या तीन आमदारांच्या शिष्टमंडळाने ना.अजितदादा पवार यांच्याकडे जिल्ह्यातील सध्याच्या पाणीटंचाईकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी केली. सध्या प्लस पातळीत आलेल्या उजनी धरणातून एक आवर्तन दिल्यास जिल्ह्यातील कालव्यावर आणि सीना जोडकालव्यावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील सुटू शकतो. या महत्त्वाच्या प्रश्नाकडे या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री महोदयांचे लक्ष वेधले. यावेळी या मागणीचे सविस्तर निवेदन उपमुख्यमंत्री पवार यांना माजी आमदार राजन पाटील आणि तीन विद्यमान आमदारांच्या शिष्टमंडळाने दिले. यावेळी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून याबाबत योग्य तो सकारात्मक निर्णय निश्चित घेऊ असे आश्वासन ना पवार यांनी या शिष्टमंडळाला दिले.

चौकट
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचा चार दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्याचा दौरा पार पडला या दौऱ्यानंतर तातडीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि प्रमुख ज्येष्ठ नेते मंडळींची बैठक बोलावली. या बैठकीसाठी माढा करमाळ्याचे दोन विद्यमान आमदार शिंदे बंधू मोहोळ चे आमदार यशवंत माने त्याचबरोबर माजी आमदार राजन पाटील हे उपस्थित होते. माढा लोकसभा मतदारसंघासाठी आ.बबनदादा शिंदे आ.संजयमामा शिंदे यांची भूमिका महत्त्वाची असून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे आजवर किंगमेकर नेतृत्व ठरले आहेत. त्यामुळे या बैठकीत सहा महिन्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पुढील रणनीतीबाबत नक्की काय काय चर्चा झाली ? याबद्दल माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments