लोकमंगल कृषीच्या विद्यार्थ्यांची कृषी अधिकारीपदी निवड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेत यश संपादन केले. यामध्ये महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी बुकेश्वर गोडगे, सहदेव पाटील व नित्यानंद भोसले यांची कृषी अधिकारी या वर्ग (एक) पदासाठी निवड झाली आहे. हे विद्यार्थी सुरूवातीपासूनच अभ्यासू व परिश्रम करणारे होते. कृषी अधिकारी या पदाचे ध्येय उराशी बाळगून सुरुवातीपासूनच त्यांनी स्वतःला अभ्यासात झोकून दिले होते. त्यांच्या जिद्द व चिकाटीमुळे त्यांची आज कृषी अधिकारी या वर्ग (एक) पदासाठी निवड झाली. कृषी क्षेत्रात शिक्षण घेणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शालेय जीवनापासून कृषी क्षेत्राशी नाळ जोडली व कृषी क्षेत्रासाठी योगदान देता यावे हे ध्येय उराशी बाळगून त्यांनी आज कृषी अधिकारी या पदाला गवसणी घातली. या यशासाठी लोकमंगल समूहाचे संस्थापक मा. सुभाषबापू देशमुख, संस्थेचे अध्यक्ष रोहनजी देशमुख, सचिवा डॉ सौ अनिता ढोबळे, लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. अमोल शिंदे, लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन फुगे यांनी त्यांचे अभिनंदन केले.



0 Comments