शरद पवार इन्सपायर फेलोशिप इन इज्युकेशन साठी नोंदणी करण्यासाठी आवाहन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहस्रचंद्रदर्शनानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई तर्फे महाराष्ट्रातील सर्जनशील शिक्षकांसाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन देण्यात येत आहे.
शिक्षण क्षेत्रात नवे काही करु पाहणाऱ्या, ध्येयाने झपाटलेल्या व त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या होतकरु गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण काम व्हावे तसेच मुलभूत संशोधनास वाव मिळावा हा या फेलोशीपचा हेतू आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने २० प्राथमिक शिक्षक आणि १० माध्यमिक शिक्षकांना तर उरलेली १० ही एकात्मिक बी.एड. करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली जाणार आहे. सदर फेलोशिपची रक्कम साठ हजार असेल.
आज घडीला शालेय शिक्षणाच्या मुलभूत पुनर्रचनेची नितांत आवश्यकता वाटते आहे. यावर्षी (२०२३-२४) महाराष्ट्रातील २० प्राथमिक आणि २० माध्यमिक शिक्षकांना ही फेलोशिप देण्यात आली. या फेलोशिप अंतर्गत भारतीय संविधानाच्या तरतुदींच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजविणे, स्वयंअध्ययन आणि सहअध्ययन यांचा अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन प्रक्रियेत प्रभावी वापर, कला व खेळ यांच्याशी समन्वय साधून विद्यार्थ्यांचे आकलन वाढविणे, वाचन आणि आकलन वाढवण्यासाठीचे उपक्रम, पालक आणि स्थानिक समाज यांचा शालेय कामकाजात आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सहभाग, शाळेची इमारत आणि परिसर यांचा शैक्षणिक साधन म्हणून वापर, अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत डिजिटल लर्निंगचा प्रभावी वापर, असे उपक्रम या वर्षीच्या फेलोशिप प्राप्त शिक्षकांनी निवडले आहेत. आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन, कोणते उपक्रम निवडावे याचे संपूर्ण स्वातंत्र्य शिक्षकांना असेल. २०२४ -२५ च्या फेलोशिपसाठीची अर्ज प्रक्रिया २५ ऑगस्ट २०२३ पासून झाली आहे. तरी इच्छुक शिक्षकांनी दिनांक २० ऑक्टोबर २०२३ अखेर https://apply.sharadpawarfellowship.com या संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज करावा असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई तर्फे शिक्षण कट्टा सोलापूर जिल्हा समन्वयक राजकिरण चव्हाण यांनी केले आहे.

0 Comments