Hot Posts

6/recent/ticker-posts

नियम, निकष बाजूला ठेवून पंचनामे करा; प्रशांत परिचारक यांची सूचना

 नियम, निकष बाजूला ठेवून पंचनामे करा; प्रशांत परिचारक यांची सूचना

           पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- अवकाळी पाऊस व गारपीटमुळे पंढरपूर तालुक्यातील 3000 हून अधिक शेतकऱ्यांना फटका बसला असून सर्व नियम निकष बाजूला ठेवून याचे पंचनामे करण्याची सूचना प्रशासनास केली असल्याची माहिती आ. प्रशांतराव परिचारक यांनी दिली. सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचेही आश्वासन त्यांनी दिले.

           शनिवारी दुपारी झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, मुंडेवाडी, कोंढारकी, चळे आदी गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मा. आ. प्रशांतराव परिचारक यांनी पाहणी केली.

           यावेळी बोलताना परिचारक यांनी, शेतकरी आपल्या कुटुंबाप्रमाणे पिकाला जपतो. मात्र ज्यावेळी हातात काही पैसे पडण्याची वेळ येते, त्यावेळी नैसर्गिक संकटामुळे सर्व काही वाहून जाते. शनिवारी झालेल्या पाऊस व गारपिट मुळे हजारो शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. द्राक्ष, डाळिंब, मका, गहू, पपई आदी पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना यामधून आधार द्यावा यासाठी आपण शासन दरबारी हा विषय लावून धरणार असल्याचे आश्वासन दिले.

           तसेच प्रांताधिकारी तहसीलदार यांना पंचनामे करताना पिकांची नोंद आहे का किंवा इतर नियमावर बोट न ठेवता सरसकट जागेवर कोणते पीक आहे किती नुकसान झाले आहे याचा तातडीने पंचनामा करावा अशा सूचना केल्या असल्याचे मा.आ. प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments