Hot Posts

6/recent/ticker-posts

नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करा - आ. समाधान आवाताडे

नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करा - आ. समाधान आवाताडे

              पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):- अवकाळी पावसाने व गारपिटीने नुकसान झालेल्या शेत पिकांचे तात्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी आज दिल्या. पंढरपूर तालुक्यात अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने नुकसान झालेल्या शेत पिकांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

              पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील लेंगरे वस्ती, मस्के वस्ती तसेच मुंडेवाडी व कोंढारकी येथील नुकसानग्रस्त द्राक्ष, आंबा, गहू आदि पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका कृषि अधिकारी भागवत सरडे, मंडळ अधिकारी बाळासाहेब मोरे तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहायक उपस्थित होते.

              पंढरपूर तालुक्यात साडेबाराशे हेक्टर फळपिकांचे तर गहू, हरभरा, मका या इतर पिकांचे असे मिळून एकूण 1800 हेक्टर पिकांचे शनिवारी आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे. या पार्शवभूमीवर आमदार समाधान अवताडे यांनी अधिकाऱ्यांसमवेत शेतशिवाराला भेट देवून पाहणी केली.  अवकाळी पाऊस व गारपिटीने हातातोंडाशी आलेले आलेले पीक उद्ध्वस्त झाले आहे. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून तात्काळ मदतीची मागणी करण्यात येईल, असेही आमदार आवताडे यांनी सांगितले.

              पंढरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांचे तात्काळ पंचनामे सुरु करण्यात आले असून, नुकसानग्रस्त पिकांचा अहवाल शासनास लवकरात लवकर शासनास सादर करण्यात येईल, असे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे संपकरी कर्मचारी हे पंचनामा करण्यासाठी कर्तव्यावर हजर झाले असल्याचेही श्री. गुरव यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 104 गावांमध्ये गारपिटीमुळे शेतीचे नुकसान
जिल्ह्यात एकूण 3469 हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त

              सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 104 गावांमध्ये गारपीट व पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे 3 हजार 469 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून 4 हजार 500 शेतकरी हे बाधित झाले आहेत. अवकाळी पावसाने व गारपिटीने आंबा, पपई, टरबूज, कलिंगड, द्राक्ष अशा फळबागांचे तर ज्वारी, गहू, हरभरा अशा पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्व नुकसानग्रस्त परिसराचे पंचनामे कृषि विभागाकडून सुरू करण्यात आले असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments