‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता तक्रारी कराव्यात- भाजपा आमदार नितेश राणे यांचे आवाहन

मुंबई, (कटुसत्य वृत्त): राज्यातील ‘लव्ह जिहाद’ च्या घटनांना पायबंद घालण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार कटीबद्ध असून राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणला जाईल असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी केले. ‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता पोलिसांकडे तसेच आंतरधर्मीय विवाह समितीकडे तक्रारी कराव्यात असे आवाहनही आ. राणे यांनी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ.माधुरीताई मिसाळ, आ. राम सातपुते, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदि उपस्थित होते.
आ.अबु आझमी, आ. जितेंद्र आव्हाड छातीठोकपणे ‘लव्ह जिहाद’ होतच नाही ,धर्मांतर होतच नाही असा दावा करत असतात मात्र अशा अनेक घटनांचे पुरावे आमच्याकडे आहेत असे सांगत आ. राणे यांनी पुराव्यानिशी आणि ध्वनीचित्रफीती सकट राज्यातील ‘लव्ह जिहाद’ बाबतचे कटु वास्तव सर्वांसमोर मांडले.
आ. राणे म्हणाले की , ‘लव्ह जिहाद’ नसतोच असे म्हणणा-यांची बोलती दौंड येथील कमाल कुरेशी व पीडित हिंदू तरुणाची तसेच खुद्द कुरेशीच्या पत्नीची ध्वनीचित्रफीत पाहिल्यावर बंद होईल, असे असंख्य पुरावे आमच्याकडे आहेत. हिंदू समाजाच्या लोकांना फसवणा-या जिहादी प्रवृत्तीला आम्ही आळा घातल्याशिवाय रहाणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर अबु आझमी आणि जितेंद्र आव्हाड हे आमदार ‘लव्ह जिहाद’ नाहीच, धर्मांतर होतच नाही असे ठामपणे सांगतात. याचा अर्थ या आमदारांचे ‘लव्ह जिहाद’ला समर्थन आहे का असा परखड सवाल आ. राणे यांनी विचारला.
जबरदस्तीने हिंदू तरूण वा तरुणींचे धर्मांतर आम्ही कदापि खपवून घेणार नाही असा इशारा आ. राणे यांनी दिला. भाजपाचे मंत्री,आमदार, सर्व कार्यकर्ते पीडितांना संरक्षण ,न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. संपूर्ण हिंदू समाज व सरकार पीडितांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही आ. राणे यांनी पीडितांना दिला.
0 Comments