सामाजिक चळवळीची विशिष्ट अशी व्याख्या करता येत नाही. कुठलीही सामाजिक चळवळ चालविण्यासाठी विचारधारा ,नेतृत्व, संघटना व कार्यकर्ते हे सर्वच घटक आवश्यक असतात. ही सामाजिक चळवळ एखाद्या सक्षम नेतृत्वाखाली संघटित असेल तर तिच्या बळकटीकरणासाठी हातभार लागत असतो. महाराष्ट्रात मराठा सेवा संघ- संभाजी ब्रिगेड अशीच एक सामाजिक संघटना आहे, जी पुरोगामी विचारसरणीच्या प्रवीण दादा गायकवाड यांच्या सक्षम नेतृत्वाखाली बहुजन समाजासाठी कार्य करत आहे. संभाजी ब्रिगेडने मागील २५ वर्षांपासून मराठा समाजाच्या प्रश्नांवर काम करत असतानाच समाजातील सर्व जाती धर्माच्या घटकांसोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत .छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराणी सकवारबाई यांच्या गायकवाड घराण्याचा ऐतिहासिक वारसा प्रवीण दादांना लाभलेला आहे. इतिहास, अर्थकारण, समाजकारणा सारख्या अनेक विषयांवर प्रभुत्व असताना अभ्यासपूर्ण व निर्भीड युक्तिवाद करण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. मराठा समाजासाठी अगदी तरुण वयापासून झटणाऱ्या प्रवीण दादांना सार्वजनिक जीवनाचा 35 वर्षांचा अनुभव आहे. प्रचंड जनसंपर्क आणि उत्तम संघटक म्हणून संभाजी ब्रिगेडला भक्कम करतानाच त्यांनी मराठा समाजाच्या आर्थिक प्रगती करिता "अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला" हे नवीन मिशन सुरू केलेले आहे .
छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांचा वारसा लाभलेली आपली मराठा संस्कृती. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी त्यांनी "अहद तंजावर तहद पेशावर, अवघा मुलुख आपला" ही संकल्पना मांडलेली होती. आपल्या रयतेने केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता तंजावर पासून पेशावर पर्यंत मुलुखगिरी करून साम्राज्य विस्तार केला पाहिजे ही खूप मोठी दूरदृष्टी महाराजांच्या संकल्पनेमागे होती .आज जागतिकीकरणाच्या युगात ऑस्ट्रेलिया, आशिया ,आफ्रिका, युरोप, अमेरिका पासून ते कॅनडा पर्यंत उद्योगधंद्यांचे जाळे निर्माण झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य विस्ताराचे स्वप्न आजच्या या ग्लोबल युगात पूर्ण करायचे तर कसे याचा विचार होणे आवश्यक आहे.
मराठा समाजाने जग ग्लोबल होत असताना जगामध्ये उपलब्ध असणाऱ्या नोकरी,व्यवसायाच्या संधी हेरल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा व उपलब्ध असणाऱ्या नोकरी, व्यवसायाच्या संधी यांची सांगड घालत जग जिंकले पाहिजे. "अहद तंजावर तहद पेशावर" या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर "अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा" ही संकल्पना पुढे नेऊन आर्थिक क्रांतीच्या जोरावर आपले अर्थकारण मजबूत केले पाहिजे .जगाच्या नकाशावर सर्वात पूर्वेला ऑस्ट्रेलिया व सर्वात पश्चिमेला कॅनडा हे दोन देश आहेत. या दोन देशांच्या दरम्यान संपूर्ण जग पसरलेले आहे . प्रचंड रोजगार आणि मोठ्या प्रमाणावर शेती असणारे ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा हे देश भारताच्या तुलनेत क्षेत्रफळाने तीन ते चार पट मोठे आहेत परंतु त्या तुलनेत लोकसंख्या मात्र तिथे खूपच कमी आहे .मनुष्यबळ कमी असल्याने या देशांमध्ये नोकरी व्यवसायाच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. उद्योगधंद्याचे मोठे जाळेच या देशांमध्ये विकसित झालेले आहे .
खरंतर जागतिकीकरण म्हणजे जगभर पसरणे. व्यापार, उद्योग, विदेशी गुंतवणूक, तंत्रज्ञान ,परदेशी प्रवास ,प्रसाराच्या माध्यमाने राष्ट्रीय अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थे करिता खुली केली जाते .1991 नंतर जागतिकीकरण ,खाजगीकरण, उदारी करणाने देशात तसेच परदेशात नोकरी व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या. ज्या समाजाने या संधी हेरल्या त्या समाजाने प्रगती केली. आज जगभरात पंजाबी, जाट, गुजराती, राजस्थानी, केरळी, तमिळी लोकांनी आपल्या कम्युनिटी प्रस्थापित केलेल्या आहेत. वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. भारतातील पंजाबी व जाट समाजांनी ऑस्ट्रेलिया व कॅनडा या देशात नोकरी व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले. भारतातील विविध खाद्यसंस्कृती जगभरामध्ये "इंडियन फूड "म्हणून प्रसिद्ध असताना महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची रेलचेल मात्र कुठेच दिसून येत नाही. भारतातील विविध कम्युनिटी जगभरामध्ये आपला ठसा उमटवत असताना मराठा समाज आज कुठे आहे? जागतिक उद्योगधंद्यांमध्ये मराठा समाजाचे स्थान काय?हा प्रश्न निर्माण होतो .
महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाजाला महाराष्ट्राबाहेर, देशाबाहेर मराठा म्हणून ओळखले जाते .पूर्वीच्या काळी दोन-चारशे एकरचा मालक असलेला मराठा जमीनदार आता लोकसंख्या विभाजनामुळे अल्पभूधारक झाला. त्यातही कोरडवाहू शेती व अनियमित निसर्गचक्रामुळे सतत दारिद्र्याशी सामना करावा लागतो. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे आजही मराठा समाजातील तरुण- तरुणींचे दहावी बारावीनंतर शिक्षण सोडून देण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. सर्वसाधारण संवर्गात समावेश होत असल्यामुळे मराठा समाजाला
सरकारी नोकरी मिळवण्यात अडचणी येतात. सतत वाढणारी लोकसंख्या व त्या तुलनेत कमी प्रमाणात उपलब्ध असणारे रोजगार यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही. केवळ सरकारी नोकरी व आरक्षणाच्या शोधामध्ये मराठा तरुण आपले जीवन खर्च करत आहे.उद्योग व्यवसायाचे क्षेत्र आपल्याकरिता नाहीच ही भावना मराठा मनात कुठेतरी रुजलेली आहे .सरकारी नोकरी मिळवायची तर आरक्षणाची दरी पार कशी करायची? आणि उद्योगधंदे करायचे तर भाग भांडवलाचा डोंगर कसा उभारायचा? या पेचात मराठा तरुण अडकलेला दिसून येतो. वास्तविक आरक्षण हे सबलीकरण व सामाजिक गतीशीलतेचे साधन मानले गेले आहे. परंतु मागील 40 वर्षांपासून आरक्षणाकरता आंदोलन- मोर्चे काढून देखील मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही .आरक्षण- मोर्चे काढून वैतागलेल्या मराठा तरुणांना आता आरक्षणाकडून अर्थकारणाकडे नेण्याची नितांत आवश्यकता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रवीणदादा गायकवाड म्हणतात की ,"आरक्षणा पलीकडे जाऊन अर्थकारणाकडे मराठा समाजाने आता वाटचाल केली पाहिजे. जागतिकीकरणाच्या संधीचा लाभ घेण्याची मानसिकता मराठा तरुणाने बाळगली पाहिजे . त्यासाठी परदेशी भाषांचे शिक्षण घेऊन परदेशात उपलब्ध नोकरी, व्यवसायाच्या संधीचा विचार व्हायला हवा" .
आज संभाजी ब्रिगेडच्या साथीने प्रवीणदादांनी समाजकारणाबरोबरच अर्थकारणाची चळवळ हाती घेतलेली आहे. "अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा" ही संकल्पना राबवणारे तसेच "मराठा समाजाची आर्थिक क्रांती" या चळवळीचे जनक असणारे प्रवीण दादा गायकवाड हे एक अजब रसायनच म्हणावे लागेल. एकीकडे संभाजी ब्रिगेडची विचारसरणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतानाच दुसरीकडे अर्थकारणा च्या चळवळीतून मराठा समाजाला नवी दिशा- नवा विचार देखील ते देत आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे हे मिशन राबवताना मराठी तरुणांना बिजनेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून योग्य ती प्रेरणा देण्याचे कार्य देखील होत आहे. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या स्थिर झाला पाहिजे, मराठा कम्युनिटी जगभरात बिजनेस कम्युनिटी म्हणून ओळखली गेली पाहिजे ,हा आर्थिक चळवळी मागचा त्यांचा खरा उद्देश आहे.
संभाजी ब्रिगेडने "अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा" नावाने फेसबुक पेज चालू केलेले आहे . बहुजन तरुणांनी परदेशामध्ये शिक्षण, नोकरी, व्यवसाय करून अटकेपार झेंडा लावला पाहिजे या उद्देशाने हा ग्रुप चालू झालेला आहे. प्रवीण दादांसह अनेक मान्यवरांचा यात समावेश आहे. अगदी पासपोर्ट ,व्हिसा कसा काढायचा? परदेशात नोकरी कशी करायची? तेथे राहायचे कसे? इथपर्यंत सगळी माहिती या ग्रुपवर दिली जाते. त्यामुळे या ग्रुपशी जोडलेला प्रत्येक जण आज किमान शंभर लोकांना तरी याची माहिती देऊन आपल्याबरोबर नोकरी- व्यवसाया निमित्त परदेशात घेऊन जात आहे. "मराठा समाजाची आर्थिक क्रांती" या चळवळीत प्रवीण दादांना सहाय्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे अजयसिंह सावंत. नोकरी व्यवसायानिमित्त इच्छुक मुलांना परदेशात पाठवताना अजयसिंह सावंत यांचे खूपच मोठे योगदान राहिलेले आहे. या चळवळीमध्ये अगदी ग्राउंड लेव्हल पासून काम करणारे अजयसिंह सावंत पासपोर्ट, व्हिसा काढून देण्यापासून ते परदेशामध्ये बोलणी करण्यापर्यंत मुलांना मदत करत असतात.
अर्थकारणाची चळवळ बळकट करण्यासाठी प्रवीण दादांनी आजवर सुमारे 63 देशांना भेटी दिल्या.16 बिजनेस कॉन्फरन्सचे आयोजन केले आहे. प्रसंगी स्वतः पदरमोड करून गरिबांच्या मुलांना परदेशात पाठवले.अनेक उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांना प्रोत्साहित केले. चळवळीच्या निमित्ताने दररोज दीडशे किलोमीटरचा प्रवास ते करत असतात. आर्थिक क्रांतीमुळे आरक्षणाच्या खाईत खितपत पडलेल्या बहुजन तरुणांमध्ये जगभर भ्रमंती करण्याचा आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला. आज बहुजनांच्या हजारो मुलांना त्यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवले आहे.संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असतानाच ब्रिगेडच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना देखील आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी उद्योग विषयी प्रशिक्षण बिझनेस कॉन्फरन्स मधून दिले जात आहे .त्यामुळे येणाऱ्या काळात मराठा समाजातून मोठे उद्योजक तयार झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
वैचारिक पार्श्वभूमी असणाऱ्या आणि सामाजिक व ऐतिहासिक प्रश्नांसाठी लढाऊ भूमिका घेणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे 28 डिसेंबर रोजी पुण्यामध्ये रोेैप्य महोत्सवी अधिवेशन होत आहे.हे रोेैप्य महोत्सवी अधिवेशन भावी काळामध्ये बहुजन समाजाला आर्थिक प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे ठरावे, यासाठी मोठ्या संख्येने आपण सर्वजण या अधिवेशनामध्ये सहभागी होऊ या. संभाजी ब्रिगेडची मराठा समाजासाठी असणारी आर्थिक क्रांतीची चळवळ अधिक बळकट करूया!!
***जय जिजाऊ...जय शिवराय!!***
प्रा.विजया पवार-नलवडे,
लेखिका अहमदनगर येथे राज्यशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.
0 Comments