मतदानाच्या नियोजनाची जबाबदारी बड्या नेत्यांकडे, विधानभवनात दिवसभर उत्साह
आपापल्या आमदारांच्या मतदानाची काळजी मोठ्या चारही पक्षांचे नेते घेत होते. पहिल्या पसंतीची, दुसऱ्या वा नंतरच्या पसंतीची मते कोणाकोणाला द्यायची आहेत याची चिठ्ठी प्रत्येक आमदाराच्या हातात दिली जात होती. शिवसेनेच्या आमदारांच्या हातात स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिठ्ठ्या दिल्या. सोबत आदित्य ठाकरे, अनिल परब, अनिल देसाई होते.प्रत्येक आमदार मतदानाला निघाले, की त्यांना शिवसेनेचे खासदार वा विधान परिषद सदस्य यापैकी एक जण सोबत करीत होता.
भाजपच्या मतांचे नियोजन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करीत होते. मतांचा पॅटर्न प्रत्येकाला ते समजावून सांगत होते. घाई करू नका, शांतपणे मतदान करा, मतदान चुकता कामा नये, असे बजावून सांगत होते. राष्ट्रवादीच्या आमदारांना सर्व प्रकारच्या सूचना देण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करीत होते. अजित पवार यांनी सर्व सूत्रे घेतल्याचे दिसत होते. काँग्रेसमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात हे मुख्यत्वे आपल्या आमदारांना मतदान कसे करायचे, प्राधान्यक्रम कसा असेल ते सांगत होते. महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे नेते एकमेकांना मते कशी, कोणत्या प्राधान्यक्रमाने द्यायच, याबाबत चर्चा करताना दिसत होते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेदेखील काही वेळ विधानभवनात आल्या होत्या. मतदान संपेपर्यंत असलेला तणाव मतदानानंतर मात्र निवळल्याचे चित्र दिसले.
सत्ताधारी-विरोधक भेटी
- भाजपचे विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे हे अजित पवार यांना जाऊन भेटले.
- देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब थोरात व अन्य
काही काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली, यावेळी हास्यविनोददेखील झाले.
राणा यांनी यावेळी दाखविली नाही हनुमान चालीसा
-राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मतपेटीत मत टाकल्यानंतर भाजप समर्थित अपक्ष आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा दाखविली होती. त्यामुळे त्यांचे मत रद्द करण्याची मागणी महाविकास आघाडीने केली होती.
- राणा यांचे मत बाद झाले नाहीपण ते संकटात नक्कीच सापडले होते. भाजपच्या नेत्यांनी याबद्दल त्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. यावेळी त्याबाबत सावध असलेले रवी राणा हनुमान चालीसा सोबत तर घेऊन आले पण त्यांनी मतदानाच्या ठिकाणी ती दाखविली नाही.
0 Comments