डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सहा ग्रंथाचे होणार प्रकाशन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्य शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र – साधने प्रकाशन समितीच्या सहा ग्रंथाचे प्रकाशन दिनांक 21 जून 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
यावेळी परिवहन व संसदीय कार्य मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब, ऊर्जामंत्री आणि समितीचे सदस्य डॉ. नितीन राऊत, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री व समितीचे उपाध्यक्ष प्राजक्त तनपुरे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे उपस्थित राहणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जनता’ पाक्षिक ‘1930 ते 1956 पर्यंत प्रकाशित झालेल्या ‘जनता’चा दुसरा खंड आणि इंग्रजी खंड 13 चा मराठी अनुवाद ‘डॉ. आंबेडकर : भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार’ - भाग -1 आणि भाग-2 या नवीन ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. इंग्रजी 13 व्या खंडाचा अनुवाद राज्यशास्त्राचे तज्ज्ञ आणि लेखक डॉ. आर. के. क्षीरसागर (औरंगाबाद ) यांनी केला आहे. तसेच सोर्स मटेरियलचा खंड -1 , डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे–खंड-8, खंड-१०, खंड -१३, या 4 इंग्रजी खंडाच्या पुनर्मुद्रित ग्रंथाचे प्रकाशन सुद्धा यावेळी होणार आहे.
मागील काही वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र – साधने प्रकाशन समितीचे काम प्रलंबित होते. परंतु या वर्षापासून पुन्हा समितीने ग्रंथ प्रकाशनाच्या कामास गती देण्यात आली आहे, असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
0 Comments