Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहराला पाणी टंचाई भासू नये म्हणून उजनीतून सहा हजार क्युसेक्स पाणी सोडण्यास प्रारंभ

 सोलापूर शहराला पाणी टंचाई भासू नये म्हणून उजनीतून सहा हजार क्युसेक्स पाणी सोडण्यास प्रारंभ

                               

बेंबळे (कटूसत्य वृत्त):- उजनी धरण सध्या मायनस(- उणे) पातळीत असले तरी, सोलापूर शहरासाठी पाणी कमी पडूनये म्हणून जलाशयातील मृतपाणी साठ्यातून सहा हजार क्यूसेक्स पाणी  21 जून 22 पासून , धरणाच्या चार दरवाजातून सोडण्यास प्रारंभ झालेला असून हे प्रवाही पाणी एक जुलै पर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे व त्यानुसार आगामी नऊ ते दहा दिवसांमध्ये धरणातून एकूण पाच टीएमसी पाणी भीमा नदीत सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे.    दरम्यान उजनी धरणात 21 जून 22 रोजी 61.06टीएमसी एकुण पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा मायनस (- उणे) 2.7 टीएमसी एवढा आहे. धरणाची टक्केवारी मायनस (-उणे) 4.86 टक्के असून धरणाची पाणी पातळी 490. 650 मीटर एवढी आहे. सध्या कालवा विसर्ग बंद करण्यात आलेला असून  भीमा- सीना जोड कालवा( बोगद्यातून) 150 क्युसेक्स पाण्याचा प्रवाह चालू आहे तर 21 जून पासून धरणाच्या चार दरवाजातून 6 हजार क्युसेक पाण्याचा भीमा नदीत विसर्ग चालू आहे.
                           विशेष वृत्त असे की सध्या पावसाळा सुरू झालेला असून देखील रोहिणी आणि मृग ही दोन्हीही नक्षत्रे पावसाअभावी कोरडी गेलेली आहेत, जिल्ह्यात कुठल्याही भागात समाधानकारक पाऊस पडलेला नसल्यामुळे सर्वत्र नद्या ,नाले, बंधारे यातील पाणी साठा कमी होऊ लागला आहे व सर्वत्र पावसाअभावी चिंताजनक वातावरण दिसून येत आहे .यातच सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा करणार्‍या टाकळी बंधाऱ्यात फक्त आठ ते नऊ फूट पाणीसाठा शिल्लक असून तो आठ दिवस पुरेल एवढाच आहे, त्यामुळे आगामी काळात सोलापूर शहरावर पाण्याचे संकट येऊ नये म्हणून उजनी धरणातून सहा हजार क्यूसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला असल्याचे अधीक्षक अभियंत्यांनी सांगितले .धरण ते टाकळी बंधारा हे अंतर 242 किलोमीटर असून सध्या सोडण्यात आलेले सहा हजार क्यूसेक्स प्रवाही पाणी आठ ते नऊ दिवसाच्या आत टाकळी बंधाऱ्यात पोहोचणार आहे व टाकळी बंधाऱ्यातील पाणी साठ्यात वाढ झाल्यामुळे सोलापूर शहरावर पाणीटंचाईचे आगामी काळात संकट निर्माण होणार नसल्याचेही धीरज साळे यांनी आवर्जून सांगितले.
                 या प्रवाही पाण्यामुळे भीमानदी मधील 14 बंधारे भरणार असून पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा आदि मोठ्या शहरासहित नदीकाठावरील शेकडो गावे व वाड्या वस्त्यावरील नागरिकांना व तसेच पशुधन व शेतीसाठी पाणी कमी पडणार नाही हे निश्चित, पण तोपर्यंत मेघराजाने कृपा करावी व सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडावा अशी सर्वत्र अपेक्षा दिसून येत आहे .


Reactions

Post a Comment

0 Comments