आषाढीपूर्वी रस्त्याची कामे पूर्ण करावीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर, (कटुसत्य वृत्त): आषाढी वारीसाठी प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करावे. आषाढी वारीत वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी सर्व संबंधित विभागाने घ्यावी. पालखी मार्ग, धर्मपुरी विसावा, मांडवी येथील रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
नियोजन भवन येथे आषाढी वारी नियोजनाबाबत आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, प्रांताधिकारी गजानन गुरव, नगर परिषद प्रशासन अधिकारी श्री. लोकरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, प्रत्येक विभागाने नेमून दिलेली कामे तत्परतेने पार पाडावी. स्वच्छता, शौचालय सुविधा, इतर डागडुजीकडे लक्ष द्यावे. पोलीस, आरोग्य, महसूल आणि नगरपालिका प्रशासनाने नियोजनपूर्व तयारी करावी. प्रत्येक पालख्यांचा विसावा, मुक्काम, रिंगण ठिकाण यांच्या जागेबाबतच्या अडचणी सामजस्याने सोडविल्या जातील. मुरमीकरण कराव्या लागणाऱ्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी ते करावे. महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागांनी समन्वयाने कामे करावीत.
कोणत्या विभागाने कोणती जबाबदारी पार पाडावी आणि करावयाची कामे, याबाबत त्यांना कळविण्यात येईल. पालखी मार्गाच्या रस्त्याच्या कडेला झाडे लावणे, खड्डे भरून घेणे, साईट पट्ट्या भरून घेणे, झुडपे काढणे, दिशादर्शक फलक लावावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, सोहळ्यासाठी लागणारे पाण्याचे टँकर याची माहिती घेण्याच्या सूचना करून पालखी मार्गावरील अतिक्रमणे पोलीस सुरक्षा घेऊन काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
श्री. स्वामी यांनी सांगितले की, वारी कालावधीमध्ये किती पाण्याचे टँकर लागणार आहेत आणि पाण्याच्या स्त्रोताचा सर्व्हे करण्यात येणार आहे.
आरोग्य विभाग यंदा 105 प्रथमोपचार केंद्राऐवजी 210 केंद्र करणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी दिली.
वारीच्या नियोजनाबाबत श्रीमती पवार यांनी माहिती दिली. आपत्ती प्रतिसाद व मदत केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण
वारीमध्ये 10 ते 15 लाख भाविक येत असतात. आपोआप गर्दी वाढत असते. पोलिसांना वारकऱ्यांना न दुखावता गर्दीवर कसे नियंत्रण राखावे, यासाठी फिल्ड प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी बाह्य संस्थेची मदत घेतली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक श्री. जाधव यांनी दिली.
0 Comments