Hot Posts

6/recent/ticker-posts

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची देशी गोवंश प्रदर्शनास भेट

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची देशी गोवंश प्रदर्शनास भेट


देशी गायीच्या विस्तार कार्यक्रमासोबतच संशोधनाची गरज - पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

            पुणे, (कटुसत्य वृत्त): देशी गायीची दूध देण्याची क्षमता प्रतिदिन १२ ते १५ लिटर होण्यासाठी अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केले.

            शिवाजीनगर येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी तर्फे आयोजित देशी गोवंश प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंग, कुलगुरु डॉ.पी.जी. पाटील, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शितलकुमार मुकणे, डॉ.धनंजय परकाळे, प्रकल्प प्रभारी सोमनाथ माने आदी उपस्थित होते.

            श्री. केदार म्हणाले, गोवंश प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना जास्त माहिती मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. 'गो-परिक्रमा' उपक्रमाद्वारे  देशी गायीच्या विविध जातीची माहिती मिळते. गाईंबाबत अधिक संशोधन करण्यासोबतच या संशोधित व वंशसुधारीत गायींचा प्रसार पशुपालकांपर्यंत करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            श्री. केदार यांनी प्रदर्शनाबाबत समाधान व्यक्त करत नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही केले. त्यांनी विविध जातिवंत देशी गायींच्याबाबत माहिती जाणून घेतली. डॉ. सोमनाथ माने यांनी प्रदर्शनाबाबत माहिती दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments