Hot Posts

6/recent/ticker-posts

‘पीसीपीएनडीटी’ वेबपोर्टलमुळे पारदर्शकता येणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

‘पीसीपीएनडीटी’ वेबपोर्टलमुळे पारदर्शकता येणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

            मुंबई, (कटूसत्य वृत्त):-प्रसुतीपूर्व गर्भलिंगनिदान (पीसीपीएनडीटी)च्या ऑनलाईन वेबपोर्टलमुळे सोनोग्राफी केंद्रांच्या नोंदणी/ नूतनीकरण प्रक्रियेत गतिमानता आणि पारदर्शकता येणार आहे. या ऑनलाईन सुविधेमुळे केंद्र धारकांना कार्यालतील हेलपाटे, अनावश्यक वेळ आणि खर्चापासून दिलासा मिळणार असल्याचे आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे यांनी आज सांगितले.

            मुंबईतील कुपरेज येथे स्थित महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या कार्यालयात आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या हस्ते पीसीपीएनडीटीच्या ऑनलाईन वेबपोर्टलचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदिप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक अर्चना पाटील, सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

            आरोग्यमंत्री श्री. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात मुलांमुलींची संख्या समान राहावी यासाठी राज्य शासन प्रसुतीपूर्व गर्भलिंगनिदान (पीसीपीएनडीटी) कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करीत आहे. महाआयटीच्या सहकार्याने चांगले उपक्रम राबविले जात आहेत. राज्यातील सोनोग्राफी केंद्रांच्या नोंदणी/ नुतनीकरणासाठी आरोग्य विभागाने ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. ज्यांना नोंदणी किंवा नुतनीकरण करावयाचे आहे अशांनी या ऑनलाईन सुविधेचा वापर करावा. या सुविधेमुळे केंद्र धारकांना कार्यालतील हेलपाटे, अनावश्यक वेळ आणि खर्चापासून दिलासा मिळणार आहे. त्यासोबत आजतागायत प्रलंबित प्रकरणांची माहिती मिळवून निकाली काढण्यास मदत होणार आहे. या ऑनलाईन सुविधेचा चांगला उपयोग करून केंद्रांच्या नोंदणी आणि नुतनीकरण प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे, असेही श्री. टोपे यांनी सांगितले.

            ही नवीन प्रणाली विकसीत केल्याबद्दल आरोग्य आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले की, या वेबपोर्टलद्वारे नोंदणी/नूतनीकरण प्रक्रियेवर देखरेख केली जाणार आहे. ही प्रणाली  चुकीच्या पद्धतींवर अंकुश ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आरोग्य क्षेत्रात उपयुक्त ठरतील असे नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य विभागाशी संबंधित इतर सेवा एका प्लॅटफॅार्मवर याव्यात यासाठी एकत्रितपणे काम करणार असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.

            केंद्र शासनाच्या ‘ईज ऑफ डुईंग’ या कार्यक्रमांतर्गत पीसीपीएनडीटी कायद्यानुसार केंद्राची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी/नुतनीकरण करण्यासाठी कार्यप्रणाली विकसीत करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार पीसीपीएनडीटी कायद्यांअंतर्गत केंद्राची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी/ नुतनीकरणासाठी http://pcpndtonlineregistration.maharashtra.gov.in ही कार्यप्रणाली महाऑनलाईन (महा-आयटी) या संस्थेच्या मदतीने विकसीत करण्यात आलेली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Reactions

Post a Comment

0 Comments