बेंबळे ग्रा.पं.च्या पोट निवडणुकीसाठी तिहेरी लढत...

बेंबळे (कटुसत्य वृत्त): माढा तालुक्यातील बेंबळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये तीहेरी लढत होत असून, सरळ लढत अपेक्षित असताना तिसऱ्या उमेदवारीमुळे ही निवडणूक रंगतदार होणार असे चित्र दिसून येत आहे.
वृत्तांत असा की बेंबळे ग्रामपंचायतीचे पाच प्रभाग असून एकुण पंधरा सदस्य आहेत. यातील प्रभाग पाचमधील सर्वसाधारण महिला जागेवर निवडून आलेल्या मंजुशा मारुती काळे यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यामुळे सध्या ही निवडणूक होत आहे, या प्रभागांमध्ये एकूण ११०५ मतदार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी सुरुवातीला एकूण सात महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते परंतु अर्ज मागे घेण्याच्या २५ मे या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले व उर्वरित तीन महिला उमेदवारांमध्ये लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.
या पोटनिवडणुकीसाठी माजी उपसरपंच विष्णूपंत हुंबे, गोविंद भोसले,संजय पवार, दिलीपराव भोसले यांच्या विमलेश्वर-सिद्धेश्वर ग्राम विकास आघाडीतर्फे रेश्मा सागर हुंबे, माजी सरपंच कैलास भोसले ,पोपट अनपट, रत्नाकर कुलकर्णी, संभाजी भगत व विजय पवार यांच्या शिवशंभो ग्राम विकास आघाडीतर्फे राजश्री समाधान भोसले व तसेच बनेश्वर ग्राम विकास आघाडी तर्फे सोनाली गौतम काळे या उमेदवारा मध्ये तीरंगी लढत होत आहे, सोनाली काळे या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उत्तम गोवर्धन काळे यांच्या भावजय आहेत व त्यांना या प्रभागामधे मिळणारी मते निर्णायक ठरणार आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत रेष्मा हुंबे आणि राजश्री भोसले यांच्यामध्ये सरळ लढत होईल अशी सर्वत्र चर्चा होती परंतु सोनाली काळे यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित .
सर्वच आघाड्यांच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहाने होत असुन घरोघर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेणे व प्रचार करणे यावर जास्त भर दिला जात आहे . रविवार दिनांक पाच जून रोजी मतदान तर सोमवार दिनांक सहा जून रोजी मतमोजणी होणार आहे.
0 Comments