Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहरातील 12 झोपडपट्टय़ांचा होणार पुनर्विकास

 सोलापूर शहरातील 12 झोपडपट्टय़ांचा होणार पुनर्विकास

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री आवास योजनें'तर्गत सोलापूरमधील झोपडपट्टय़ांचा पुनर्विकास केला जाणार आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात 12 झोपडपट्टय़ांचे काम हाती घेण्यात आले आहे.सोलापूर शहरात प्रधानमंत्री आवास योजना राबविण्याबाबत महापालिकाही नोडल एजन्सी म्हणून काम पाहात आहे. एकूण 4 घटकांसाठी ही योजना आहे. यातील पहिल्या घटकामध्ये झोपडपट्टी पुनर्विकासाची योजना आहे. काही वर्षांपूर्वी महापालिकेने महापालिका क शासकीय जागेवर असलेल्या 12 झोपडपट्टय़ांची नावे निश्चित करून पुनर्विकासाबाबतचा आराखडा तयार केला होता. मात्र, या योजनेंतर्गत घटक क्र. 1साठी रो-हाऊस बांधून देण्याची तरतूद नसल्याने बहुमजली इमारतीच्या या योजनेस झोपडपट्टीवासीयांनी विरोध केला. त्यामुळे या योजनेसंदर्भातील शासनाकडे पाठविलेला प्रस्तावच रद्द करण्याची शिफारस तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केली होती. त्यामुळे ही योजना बारगळली होती.या पार्श्वभूमीवर नव्याने या योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. मनपा व शासकीय जागेवर असलेल्या सुभाषनगर झोपडपट्टी-जेलरोड पोलीस ठाण्याजवळ, कस्तुरबा गांधी झोपडपट्टी-मोदी, कोंचीकोरवे झोपडपट्टी- भावनाऋषी पेठ, देवनगर झोपडपट्टी-सोरेगाव, गांधीनगर झोपडपट्टी क्र. 3-अक्कलकोट रोड, जोशी गल्ली झोपडपट्टी-रविवार पेठ, सुभाषनगर झोपडपट्टी-साईबाबा चौक, बनसिद्धनगर झोपडपट्टी-सोरेगाव, बहुरूपीनगर झोपडपट्टी-विजापूर रोड, गणेशनगर झोपडपट्टी-देगाव, मौलाली चौक झोपडपट्टी, रेवणसिद्धेश्वर झोपडपट्टी क्र. 1 व 2-विजापूर रोड या 12 झोपडपट्टय़ांचा यामध्ये समावेश आहे.'प्रधानमंत्री आवास येजनें'तर्गत या झोपडपट्टय़ा हटवून या ठिकाणी पक्की घरे बांधण्यात येणार आहेत. 300 स्क्वेअर फुटांपर्यंत प्रतिघराच्या बांधकामासाठी अडीच लाखांचे अनुदान झोपडपट्टीवासीयांना देण्यात येणार आहे. याअंतर्गत केंद्र सरकारचा दीड लाख, तर राज्याचा एक लाख हिस्सा आहे. अनुदान घेऊन झोपडपट्टीधारकाने स्वतःच घराचे बांधकाम करावयाचे आहे.


चावडीवाचनानंतर झोपडपट्टीधारकांची निश्चिती होणार

या योजनेंतर्गत प्रत्येक झोपडपट्टीमध्ये मनपाच्या 'प्रधानमंत्री आवास योजने'च्या कक्षातर्फे चावडीवाचनाचे काम सुरू आहे. चावडीवाचनानंतर झोपडपट्टीधारकांची निश्चिती होणार आहे. झोपडपट्टीधारकाचे नाव निश्चित झाल्यास लाभार्थी निश्चितीची पुढील प्रक्रिया होणार आहे. मनपाचे माहिती तंत्रज्ञानतज्ञ नागनाथ पदमगोंडे, समाजविकासतज्ञ सिद्धाराम मेंडगुदले, स्थापत्य अभियंता स्वप्नील गायकवाड, नगररचनातज्ञ पूजा बुदनाळे, संतोष ऐदळे चावडीवाचनाचे काम करीत आहेत. चावडीवाचनाद्वारे झोपडपट्टीधारकांची निश्चिती करण्याचे काम सुरू आहे. चावडीवाचन झाल्यावर ज्या झोपडपट्टीधारकांना हरकती घेण्यास 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. झोपडपट्टीबाबत वाद, वारसदार आदींबाबत निरसन याअंतर्गत होणार आहे. आतापर्यंत 3 हरकती प्राप्त झाल्या आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments