सदैव शंका उपस्थित करणारे भाजप कुठल्याच प्रश्नावर सामोपचाराने मार्ग काढण्यास इच्छुक नाही - महेश तपासे

राजद्रोहाचा आरोप 'हनुमान चालीसा' म्हणण्यावर केला गेला हा शोध सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी कसा लावला...ज्यापद्धतीने 'हनुमान चालीसा' चे पठण केले त्याचपद्धतीने भारतीय राज्यघटनेची 'उद्देशिका' नक्कीच त्यांच्या लक्षात असेल...
मुंबई (कटूसत्य वृत्त):- सर्वपक्षीय बैठकीत भाजपचा प्रतिनिधी उपस्थित राहिला असता तर त्यांची भूमिका राज्यसरकारला समजली असती परंतु सदैव शंका उपस्थित करणारे भाजप कुठल्याच प्रश्नावर सामोपचाराने मार्ग काढण्यास इच्छुक नाही हे त्यांच्या अनुपस्थितीमुळे सिद्ध झाले आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.राजद्रोहाचा आरोप 'हनुमान चालीसा' म्हणण्यावर केला गेला हा शोध सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी कसा लावला हा निश्चितच संशोधनाचा विषय आहे अशी खोचक टिकाही महेश तपासे यांनी यावेळी केली.देवेंद्र फडणवीस यांनी ज्यापद्धतीने हनुमान चालीसाचे पठण केले त्याचपद्धतीने भारतीय राज्यघटनेची उद्देशिका नक्कीच त्यांच्या लक्षात असेल याची मला पूर्ण खात्री आहे असा उपरोधिक टोला महेश तपासे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.देवेंद्र फडणवीसांनी अशाच जोशात राज्यघटनेच्या उद्देशिकाचा अर्थ सर्व माध्यमांसमोर आम्हा सर्व भारतीयांना समजावून सांगावे अशी विनंतीही महेश तपासे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये भाजपचा एकही प्रतिनिधी का आला नाही असा प्रश्न महाराष्ट्राची जनतेला पडला असल्याचे महेश तपासे म्हणाले.राज्यातल्या अनेक प्रश्नांवर आतापर्यंत संवादाच्या माध्यमातून तोडगा काढावा ही भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. कोरोना काळातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली होती याची आठवण करून देतानाच धार्मिक स्थळावरील भोंगे या मुद्द्यावरून राज्यातले सामाजिक वातावरण बिघडू नये या उद्देशाने बोलावलेल्या सर्व पक्षीय बैठकीला भाजपचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते ही गंभीर बाब आहे असेही महेश तपासे यांनी सांगितले.
0 Comments