उदयसिंह खांडेकर याने सांगोला तालुक्याचे नाव उज्ज्वल केले ; मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या देवळेच्या उदयसिंह खांडेकर यांचा सत्कार संपन्न
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला तालुका जरी राज्याच्या नकाशावर दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात असला तरीही, सांगोला तालुक्यात गुणवत्तेचा कधीच दुष्काळ नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे. नुकत्याच सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 92 किलो वजनी गटातून देवळे ता. सांगोला येथील उदयसिंह दिलीप खांडेकर याने रौप्य पदक मिळवून सांगोला तालुक्याचे नाव राज्याच्या नकाशावर उज्ज्वल केले आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी केले. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या उदयसिंह खांडेकर यांचा गुरुवार दि 14 एप्रिल रोजी सांगोला येथील राष्ट्रवादी भवन येथे दिपकआबांचा हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना दिपकआबा म्हणाले, अनंत अडचणी निसर्गाची अवकृपा आणि जगण्याची खडतर लढाई लढत असताना सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कधीच आपली शेती मातीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करतो ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. देवळे सारख्या अत्यंत छोट्याशा गावातून पुढे येवून उदयसिंह खांडेकर यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आजच्या तरुणाईपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. आई बापाच्या कष्टाची जाणीव आणि आपल्या गावचे आपल्या तालुक्याचे नाव उज्ज्वल करण्याची जिद्द उराशी असलेला उदयसिंह खांडेकर भविष्यात निश्चित महाराष्ट्र केसरी किंवा हिंदकेसरी होवून आपल्या शेजारच्या गावातून म्हणजेच बामणी सारख्या गावातून हिंदकेसरी बनलेल्या पै.सुनील साळुंखेची परंपरा समर्थपणे पुढे घेवून जाईल असा विश्वास व्यक्त करून भविष्यात सर्वोतोपरी मदत करण्याचे शेवटी दिपकआबांनी आश्वासन दिले. यावेळी समाधान अनपट, तानाजी खांडेकर, सरपंच उद्धव खांडेकर, तात्यासाहेब जाधव, दिलीप खांडेकर, मारुती खांडेकर, वस्ताद बाळू हाके, सुभाष बर्गे, प्रकाश श्रीराम, वाढेगावचे सरपंच नंदकुमार दिघे, श्रीरंग बाबर व तात्यासाहेब बाबर आदी उपस्थित होते.
0 Comments