Hot Posts

6/recent/ticker-posts

विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत काशी व बुद्धगया यात्रा - आ.बबनदादा शिंदे

विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत काशी व बुद्धगया यात्रा - आ.बबनदादा शिंदे

माढा ,पंढरपूर, माळशिरस व करमाळा तालुक्यातील जेष्ठ नागरिकांचा समावेश असणार

          बेंबळे (कटूसत्य वृत्त):- विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक  मंडळ निमगांव(टे) व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांच्या सहयोगातून सालाबादप्रमाणे खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त माढा, पंढरपूर,माळशिरस व करमाळा या तालुक्यातील जेष्ठ नागरीकांसाठी मोफत काशी व बुध्दगया यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

          अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, हिंदू धर्मामध्ये काशी दर्शनास विशेष महत्व आहे. काशी दर्शन झाल्याने मोक्षप्राप्ती झाल्याचे मानले जाते. समाजामध्ये जेष्ठ नागरिक वर्ग मोठ्या प्रमाणात असून त्यांना आर्थिक व इतर घरगुती अडचणींमुळे काशी दर्शनास जाणे शक्य होत नाही. म्हणूनच सन 2010 पासून विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक  मंडळ निमगांव(टे) व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांच्या सहयोगातून प्रतिवर्षी मोफत जेष्ठ नागरिक काशी यात्रेचे आयोजन करण्यात येत असून प्रतिवर्षी 1 हजार जेष्ठ नागरिकांना काशी दर्शनाचा लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माढा, पंढरपूर, माळशिरस व करमाळा या तालुक्यातील आजअखेर 15 हजार जेष्ठ नागरिकांनी या मोफत काशी यात्रेचा लाभ घेतलेला आहे. तसेच बौध्दांसाठी बुध्दगया दर्शनास मोठे महत्व आहे. त्यामुळे त्यांचेसाठेही यापूर्वी वेळोवेळी मोफत बुध्दगया यात्रेचे आयोजन करून 2 हजार बौध्दांना बुध्दगया यात्रेचे दर्शन घडविले आहे.

          मागील दोन वर्षाचे कालावधीत कोव्हीड-19 या आजाराचे पार्श्वभुमीमुळे मोफत काशी व बुध्दगया यात्रेचे आयोजन करता आलेले नाही. यावर्षी साधारण माहे जून मध्ये मोफत काशी व बुध्दगया यात्रेचे आयोजन करण्यात आलेले असून अंदाजे 1 हजार जेष्ठ नागरिकांना मोफत काशी यात्रेसाठी व 200 बौध्दांना बुध्दगया यात्रेसाठी पाठविण्याचा मनोदय असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली. तसेच यात्रेसाठी इच्छुक जेष्ठ नागरिकांनी त्यांची नाव नोंदणी कारखान्याचे शेती विभागाचे स्टाफकडे करावी असे आवाहन आ.शिंदे यांनी केले आहे.

मोफत विवाह सोहळा

          खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि.24 ते 27 मार्च या कालावधीमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 450 नेत्ररूग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया  करण्यात आलेली आहे. तसेच 22 मे रोजी विठ्ठलराव शिंदे कारखाना कार्यस्थळावर मोफत सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून त्यासाठीची  विवाह नोंदणी सुरू असून इच्छुक वधू-वरांनी त्यांची विवाह नोंदणी कारखाना कार्यस्थळावर व शेती विभागाचे गट सेंटरवर करावी असेही आवाहन आ.शिंदे यांनी याप्रसंगी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments