Hot Posts

6/recent/ticker-posts

भर उन्हाळ्यात शहरात मिळेना गरजेच्या निम्मेही पाणी !

भर उन्हाळ्यात शहरात मिळेना गरजेच्या निम्मेही पाणी !

           सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र जल प्राधिकरणाच्या निर्णयानुसार, शहरातील प्रत्येक नागरिकास प्रतिदिन १३५ लिटर पाणी मिळायला हवे. शहराची सध्याची लोकसंख्या ११ लाखांपेक्षा अधिक असून दररोज १७० ते १८० एमएलडी (१७ ते १८ कोटी लिटर) पाणी दिले जाते, असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आहे. त्यात शहरातील नागरिकांसह चिंचोळी, अक्कलकोट रोड व होटगी रोडवरील एमआयडीसीचाही समावेश आहे. सध्या शहरातील प्रत्येक नागरिकास दररोज ७० लिटरसुद्धा पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे.

           हद्दवाढ भाग महापालिकेत येऊन जवळपास ३० वर्षे होऊनही तेथील नागरिकांना नियमित आणि पुरेसे पाणी मिळालेले नाही. शहराचा विस्तार वाढला, पण पाणीपुरवठ्याची पाइपलाइन जुनीच आहे. उजनी धरण उशाला असून औज, एकरुख तथा टाकळी बंधारा शहराजवळ आहे. तरीही, नागरिकांना नियमित पाणी मिळू शकलेले नाही, हे विशेष. प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्र जल प्राधिकरणाने ठरवून दिल्याप्रमाणे दररोज १३५ लिटर पाणी मिळणे अपेक्षित आहे. पण, विस्कळित पाणीपुरवठ्यामुळे अनेकांना तेवढे पाणी मिळतच नाही, ही वस्तुस्थिती आहे. चार-पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने त्याचे मोजमापच होत नाही. महापालिकेला दरवर्षी पाणीपट्टी भरूनही अनेकजण बाहेरून विकत पाणी घेतात, ही अवस्था स्मार्ट सिटीतील नागरिकांची आहे. सत्ताधारी व विरोधकांनी निवडणुकीपूर्वी अनेकदा घोषणा केल्या, आश्वासने दिली, पण प्रत्यक्षात काहीच उतरले नाही. त्यामुळे नागरिकांना २२ व्या शतकातही पाण्यासाठीच संघर्ष करावा लागतोय, हे दुर्दैव.पाणी मिळो, न मिळो भरा पाणीपट्टी जलसंपदा विभागाने त्यांचा वाढलेला देखभाल- दुरुस्तीचा खर्च आणि बाष्पीभवन होणाऱ्या पाण्याचा अभ्यास करून पाण्याचे नवे दर निश्चित केले आहेत. २२ मार्च २०२२ रोजी त्यांनी नवे आदेश काढत हे दर ठरविले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या क्षेत्रासाठी प्रत्येक एक हजार लिटर पाण्याकरिता घरगुतीसाठी ५५ पैसे तर वाणिज्यसाठी पावणेतीन रुपये तर औद्योगिकसाठी ११ रुपयांपासून १६५ रुपयांपर्यंत दर निश्चित केले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने झोननिहाय पाणी वापराची माहिती मागविली असून, प्रशासनाकडून उत्पन्नवाढीसाठी पाण्याचे दर वाढविले जाण्याची शक्यता आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments