विठ्ठल-रुक्मिणी मंदीराच्या विकासासाठी शासनाकडे तत्काळ तपशिल सादर करावा
%20(1).jpeg)
.jpeg)
विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्या सूचना
पंढरपूर, (कटूसत्य वृत्त):- अठ्ठाविस युगापासून विटेवर उभा असणाऱ्या सावळ्या विठ्ठलाच्या मंदीराचा विकास व्हावा. यासाठी राज्य शासनाकडून अर्थसंकल्पात 73 कोटी 80 लाख रुपयांचा आवश्यक निधी देण्याची घोषणा झाली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदीर व परिसराचा नव्याने विकास साधताना पुरातन वास्तूचे संवर्धन करण्यासाठी मंदीर समितीने पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार तत्काळ तपशिल शासनाकडे सादर करावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी दिल्या.विठ्ठल-रुक्मिणी मंदीराचे संवर्धन करण्यासाठी करण्यात येणाऱ्या आराखड्याबाबत आणि पंढरपूर नगरपालिकेच्या विविध विकास कामांबाबत संत तुकाराम भवन, पंढरपूर येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीस मंदीर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, समितीचे सदस्य जानेश्वर महाराज जळगांवकर, शकुतंला नडगिरे, संभाजी शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, प्रांताधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीस जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनीही दूरदृश्याव्दारे सहभाग घेतला होता.श्रीमती गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले, पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शानुसार तत्काळ शासनाकडे नव्याने विकास करण्यात येणाऱ्या कामांचा तपशिल 02 मे 2022 पर्यंत विधी व न्याय विभागाला सादर करावा. जेणेकरुन शासनाकडून मंदीर समितीस तत्काळ निधी प्राप्त होईल. जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने भाविकांना विश्वासात घेवून संपूर्ण आराखड्याचे सादरीकरण करावे. पंढरपूर नगरपालिकेच्या यमाई तलाव व परिसराची सुधारणा करण्यासाठी नगरपालिकेने आराखडा तयार केला असून, त्यामध्ये ‘अर्बन फॉरेस्ट’ सारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवावा, सुशोभिकरणासाठी स्थानिक नागरिक, पर्यावरण प्रेमी यांच्याकडून सूचना घ्याव्यात. तसेच जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. सफाई कामगारांना घरे उपलब्ध होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक घेवून, सर्व संमतीने कामगारांना घरे उपलब्ध होतील याबाबत नियोजन करावे. तसेच शहरात बांधण्यात आलेले शौचालयाची संख्या व त्यांची उपयोगिता याचा अहवाल सादर करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.तत्पूर्वी श्रीमती गोऱ्हे यांनी विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेवून मंदीराची पाहणी करुन आवश्यक सूचनाही दिल्या.
0 Comments