Hot Posts

6/recent/ticker-posts

युवकांनी घटनेतील तत्वांचा अंगीकार करावा संविधान जागर आणि जनजागृती कार्यक्रमातील सूर

युवकांनी घटनेतील तत्वांचा अंगीकार करावा संविधान जागर आणि जनजागृती कार्यक्रमातील सूर



            सोलापूर,(कटूसत्य वृत्त): राज्यघटनेच्या आधारावर देशाची एकता साधली आहे. तरुणांनी घटनेतील तत्वांचा अंगिकार करून वाटचाल करावी, असा सूर आज संविधान जागर व जनजागृती कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.

           भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता कार्यक्रम व स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त येथील सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय व वालचंद महाविद्यालयातील समाजकार्य विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.संतोष कोटी,  समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती चंचल पाटील, हिराचंद नेमचंद महाविद्यालयाचे प्राचार्य.डाॅ. सत्यजित शहा,  कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉ. बोंदाडे, भारती विद्यापीठ समाजकार्य विभागाच्या संचालिका डाॅ.जयश्री मेहता, भाई छन्नुसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस. बी. गायकवाड, वालचंद समाजकार्य विभागप्रमुख प्रा.डाॅ.निशा वाघमारे आदी उपस्थित होते.

           वालचंद महाविद्यालयाचे हिंदी विभागाचे प्रमुख प्रा.डाॅ. शिंदे यांनी राज्यघटना तयार झालेल्या प्रक्रियेचा आढावा घेताना त्यात सर्वसामान्य नागरिकांना मिळालेल्या विविध अधिकारांचा उहापोह केला. तरुणांनी राज्यघटनेचा अभ्यास करावा. त्याप्रमाणे आपली वाटचाल ठेवावी. सामाजिक आणि आर्थिक समानता येण्यासाठी प्रयत्न करून डाॅ. आंबेडकरांचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन त्यांनी केले.

             सहायक आयुक्त श्री. आढे यांनी सामाजिक समता कार्यक्रमात सहा एप्रिलपासून सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला, तसेच "डाॅ.बाबासाहेब होते म्हणून आज आपण सन्मानपूर्वक जगत आहोत" असे प्रतिपादन केले. १६ एप्रिलपर्यंत होणा-या कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. त्यांनी घटनेच्या प्रास्ताविकाचे वाचन केले.

            यावेळी विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी , शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यूटयूब व फेसबुक या समाजमाध्यमांवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले.

           प्रा. डाॅ.निशा.वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. डाॅ.ज्योती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अभय जाधव यांनी आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments