Ads

Ads Area

सांगोला शहर हद्दीत 91,303 ; वृक्ष सांगोला नगरपरिषदेमार्फत वृक्षगणनेचे काम पूर्ण!

सांगोला शहर हद्दीत 91,303 वृक्ष
सांगोला नगरपरिषदेमार्फत वृक्षगणनेचे काम पूर्ण!

          सांगोला (कटूसत्य वृत्त): पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या पृथ्वी, जल, आकाश,वायू,अग्नी या पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये सांगोले नगरपरिषदेमार्फत  पर्यावरण संरक्षण व संवर्धन करणेसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.या अभियानांतर्गत असणाऱ्या पंचमहाभूतां पैकी पृथ्वी या घटकांतर्गत शासन निर्देशानुसार शहरातील वृक्ष व जुने वारसा वृक्ष यांची गणना करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी श्री. कैलास केंद्रे यांनी दिली.

          भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वातील कलम 48 अ नुसार वन, वन्यजीव, पर्यावरण व इतर नैसर्गिक संसाधंनाच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी संबंधित राज्यांवर सोपविण्यात आलेली आहे. याशिवाय कलम 51अ(ग) अन्वये वन, वन्यजीव, नदी, तलाव या सारख्या नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच प्राणिमात्राबाबत आदर बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एखाद्या क्षेत्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 33% क्षेत्रावर वृक्षलागवड असणे आवश्यक आहे.परंतु मानवाने नागरिकीकरण, विस्तारीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जंगलेच्या जंगले तोडून टाकली. जंगले तोडून त्या ठिकाणी आज उंचच्या उंच इमारती उभ्या केल्या गेल्या आहेत.मानवाने विकास साध्य केला, मात्र हे करत असताना पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होऊन निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे आज आपण 33% वृक्ष लागवड क्षेत्राच्या ध्येयापासून खूप दूर आहोत.त्यामुळे फक्त विकास न करता तो शाश्वत होण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करणे ही काळाची गरज बनली आहे.

          महाराष्ट्र ( नागरी क्षेत्र ) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, 1975 अन्वये दर 5 वर्षांनी नगरपरिषदाना वृक्ष गणना करणे बंधनकारक करण्यात आले आहे.सदर अधिनीयमांन्वये 10 सेमी घेर आणि 3 मीटर पेक्षा जास्त उंची असणाऱ्या झाडांना वृक्ष संबोधता येईल.तसेच 50 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या झाडांना पुरातन वृक्ष संबोधता येईल. त्यानुसार सांगोले नगरपरिषदेमार्फत शहर हद्दीत 08 मार्च ते 29 मार्च 2022 या कालावधीमध्ये वृक्षांचे सर्वसाधारण नाव, वैज्ञानिक नाव,उंची, घेर ,वय , अंदाजे हरित आच्छादन , मालकी, वृक्षांची सद्यस्थिती आणि वृक्षांचा अक्षांश व रेखांश स्थान यासह जिओ टॅग छायाचित्रे इत्यादी बाबींची नोंद घेऊन वृक्षगणना व वारसा वृक्ष गणना पूर्ण केली असून त्यामध्ये विविध 47 प्रकारचे एकूण 91303 वृक्ष आढळून आले असल्याची माहिती मुख्याधिकारी केंद्रे यांनी दिली.

          वृक्ष गणना केल्यामुळे नगरपरिषद हद्दीत सद्य स्थितीत 91,303 वृक्ष असल्याची माहिती मिळाली व यामुळे येत्या काही वर्षात नगरपरिषदेच्या एकूण क्षेत्राच्या 33% वन आच्छादन करण्याची योजना आखून त्याची अंमलबजावणी करण्यास व संगोल्यास 'हरित शहर' करण्यास नक्कीच मदत होईल.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close