सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावरील भाविकांच्या एन्ट्रीची राज्यभर चर्चा
विधानसभेच्या अधिवेशनात ऐरणीवर आला मुद्दा कारवाई होणार की नेहमीप्रमाणे कार्यवाही ?
मोहोळ (साहिल शेख):- सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावरील भाविकांच्या एन्ट्रीची राज्यभर चर्चा संपूर्ण राज्यभरात सुरू आहे. कारण विधानसभेच्या अधिवेशनात हा धक्कादायक मुद्दा ऐरणीवर आला असून महामार्ग पोलिस प्रशासनाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी सोलापूर जिल्ह्यातील या नामुष्कीजनक गैरप्रकारावर आळा बसावा यासाठी कठोर कारवाई करणार की नेहमीप्रमाणे जुजबी कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महामार्गावरील सुरक्षितता आणि वाहन कागदपत्रे तपासणीची अद्ययावत यंत्रणा असावी या हेतूने स्थापन करण्यात आलेला महामार्ग पोलीस ही संकल्पना सोलापूर जिल्ह्यात मात्र पुरती बदनाम होताना दिसत आहे. वास्तविक पाहता अपघात प्रसंगी घटनास्थळी त्वरित धाव घेणे, वाहतूक खोळंबल्यानंतर मार्ग रिकामा करून वाहतूक पूर्ववत करणे ही देखील या शाखेची कर्तव्ये असल्याचा विसर या शाखेत पडला आहे. विशेष म्हणजे यासाठी स्वतंत्र मुख्यालय आणि परिक्षेत्र विभाग असल्याने हा विभाग सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कक्षेत येत नाही. शिवाय ही बाब सर्वसामान्यांना माहिती नसल्यामुळे हे सर्व प्रताप जिल्हा पोलिस प्रशासनाचे कर्मचारी करतात अशी धारणा त्यांची होत आहे. महामार्ग पोलिसांच्या या प्रतापामुळे जिल्हा पोलीस प्रशासनास मात्र टीकाटिपणीचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुणे ते सोलापूर महामार्गावर केवळ सोलापूर जिल्ह्यातच हा प्रकार सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील एकाही टोल नाक्यावर महामार्ग शाखेचे कर्मचारी असे उपद्व्याप करताना दिसून येत नाहीत. मग सोलापूर जिल्ह्यातच वाहनधारकांची लूट का ? असा संतप्त सवाल वाहनधारकातून विचारला जात आहे. याचा मोठा परिणाम सोलापूर जिल्ह्याच्या सांप्रदायिक पर्यटनावर होताना दिसून येत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून याशिवाय परराज्यातून अनेक भाविक सोलापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांना भेटी देतात. परराज्यातील पासिंग पाहून आणि परजिल्ह्यातील वाहने ओळखून त्यांना बाजूला घ्यावयास लावून त्यांच्याकडून सक्तीने पैसे उकळले जातात. चेकिंग च्या नावाखाली एन्ट्री गोळा करण्याची ही गोष्ट आता लपून राहिली नाही.आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात जागृत नागरिकांनी याचे स्टिंग ऑपरेशन करणे आता गरजेची बाब बनली आहे. याशिवाय या महामार्ग शाखेचे सुरू असलेले महाप्रताप या विभागाच्या वरिष्ठांनी थांबवण्यासाठी ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतील महामार्ग पोलिस प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या चेकिंगद्वारे वाहनधारकांची लूट होत असल्याची कैफियत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी थेट विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन यामध्ये मांडली आहे. श्री पांडुरंगाच्या आणि आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांनाही याचा त्रास होत आहे. विशेष म्हणजे कोणत्या मार्गावर कोणी वसुली करायची यासाठी मार्ग देखील वाटून घेतल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राऊत यांनी चार दिवसांपूर्वी विधिमंडळात केल्यामुळे महामार्ग पोलिस प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. सावळेश्वर येथे राजरोसपणे दररोज रस्त्यावर चेकिंगच्या नावाखाली वाहनधारकांकडून पैसे उकळले जात असल्याचे सर्वसामान्य वाहनधारक दररोज येताना जाताना पाहतात. दररोज विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथके, त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे वरिष्ठ नेते मंडळी याच ठिकाणाहून जातात. मात्र एखाद्यालाही हा सुरू असलेला प्रकार थांबावा असे वाटू नये ही नक्कीच लूट झालेल्या वाहनधारकांची शोकांतिका म्हणावी लागेल.
0 Comments