प्रज्ज्वला योजनेतील गैरव्यवहारासाठी चौकशी समिती; शिवसेनेच्या मागणीनंतर चौकशीचे आदेश
मुंबई (कटूसत्य वृत्त):-राज्य महिला आयोगाकडून चालवल्या जात असलेल्या प्रज्ज्वला योजनेतील निधी वाटपात झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी केली जाणार असून त्यासाठी समिती नेमली जाणार आहे, अशी माहिती महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी विधान परिषदेत दिली. राज्य महिला आयोगाकडून प्रज्ज्वला योजना राबवली जाते. राज्यातील २८८ मतदारसंघापैकी ९८ मतदारसंघात ही योजना राबवण्यात आली. त्यात निधी वाटपात गैरव्यवहार झाला. त्याचबरोबर ही योजना राबवताना निवडणुकीत त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी वापर केला गेला. या सर्वांची चौकशी करावी आणि तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधात कारवाई करणार का, असा प्रश्न शिवसेना सदस्य मनीषा कायंदे यांनी यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी लक्षवेधीवर उत्तर दिले. त्या म्हणाल्या, 2019 मध्ये प्रज्ज्वला योजनेत निधीचा वापर हा कोणतीही तरतूद नसताना महिला बचत गटांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. निधीच्या गैरवापराबाबत चौकशी केली जाईल तसेच योजनेच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे. गरज पडल्यास ही समिती तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षांचीही चौकशी करेल, अशी माहिती ठाकूर यांनी दिली. महिला आयोगाची पाच विभागीय कार्यालये वर्षभरात अॅसिड हल्ल्यातील पीडितांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत का तसेच मुंबईत महिला आयोगाचे कार्यालय आहे. राज्यातील महिलांना त्यांच्या तक्रारींसाठी मुंबईत यावे लागते. त्यासाठी 2019 च्या अर्थसंकल्पात सांगितल्याप्रमाणे पाच विभागीय कार्यालये आणि बाल संरक्षण कार्यालये कधी सुरू करणार आहात, असा प्रश्न मनीषा कायंदे यांनी विचारला. यावर उत्तर देताना अॅसिड हल्ला पीडितांना नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर राज्यातील पाच विभागीय क्षेत्रात महिला आयोग आणि बाल संरक्षण विभागाची कार्यालये वर्षभराच्या आत सुरू करू, अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी सभागृहाला दिली.
0 Comments