गरीबांसाठी ११५ लाख घरांना मंजूरी; ५६ लाख घरांचे बांधकाम पुर्ण
नवी दिल्ली(वृत्त सेवा):- राज्ये, केंद्रशासित प्रदेशांनी सादर केलेल्या प्रकल्प प्रस्तावांच्या आधारे, देशभरात ११५ लाखांहून अधिक घरे मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी ५६.२० लाख पूर्ण झाली आहेत. एकूण मंजूर घरांपैकी गेल्या दोन वर्षात २९ लाखांहून अधिक घरांना मंजुरी देण्यात आली आहे.प्रकल्प पूर्ण होण्यासाठी साधारणपणे १२ ते १८ महिने लागतात. त्यामुळे घरांसाठी मंजुरी, बांधकाम आणि बांधून पूर्ण करणे यात नेहमीच अंतर असते.सर्वांसाठी घर या अभियानाचा कालावधी ३१ मार्च २०२२ पर्यंत आहे आणि त्यानंतर कोणतीही अतिरिक्त घरे मंजूर केली जाणार नाहीत. राज्ये,केंद्रशासित प्रदेशांना विस्तृत प्रकल्प अहवालानुसार उर्वरित सर्व मंजूर घरे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.सर्वांसाठी घरे या सरकारच्या संकल्पनेच्या अनुषंगाने, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालय २५ जून २०१५ पासून राज्य, केंद्रशासित प्रदेशांना सर्व पात्र शहरी कुटुंबांना सर्व प्रकारच्या हवामानात टिकून राहतील अशी पक्की घरे पुरवण्यासाठी केंद्रीय सहाय्य देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना-शहरी योजनेची अंमलबजावणी करत आहे.पात्र लाभार्थ्यांसाठी घरांच्या वास्तविक मागणीचे मूल्यांकन करण्यासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी प्रधानमंत्री आवास योजना-शहरी अंतर्गत मागणी सर्वेक्षण हाती घेतले होते. या योजनेअंतर्गत वर्ष २०१७ मध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी प्रमाणित केलेल्या घरांची एकूण मागणी ११२.२४ लाख आहे. मात्र ही घरांची मागणी बदलत्या स्वरूपाची असते, त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान पात्र ठरलेल्या शहरी कुटुंबांची अतिरिक्त घरांची मागणी देखील यात समाविष्ट करण्यात आली आहे.
0 Comments