Hot Posts

6/recent/ticker-posts

मुळेगाव तांडाच्या परिवर्तन सोहळ्याला दुसऱ्याच दिवशी गालबोट, हातभट्टी गुत्त्यावर छापा; सातजणांना अटक

 मुळेगाव तांडाच्या परिवर्तन सोहळ्याला दुसऱ्याच दिवशी गालबोट, हातभट्टी गुत्त्यावर छापा; सातजणांना अटक

                                                 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अवैध धंद्यांमुळे दुर्लक्षित असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील नागरिकांचे परिवर्तन व्हावे, यासाठी पोलिसांच्या प्रयत्नाने गारमेंट उद्योगाचा उद्घाटन सोहळा झाला.मात्र, दुसऱयाच दिवशी आज या सोहळ्याला गालबोट लागल्याचे समोर आले. राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांनी दोन ठिकाणी धाड टाकून हातभट्टी दारू गाळणाऱया सातजणांना अटक केली आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा हे बहुचर्चित गाव अवैध धंद्यांमुळे दुर्लक्षित आहे. या गावात ग्रामीण पोलीस विभागाने परिवर्तन करण्याचा विडाच उचलला आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी येथील हातभट्टी दारू गाळणाऱया हातांना रोजगार उपलब्ध करून देत सोमवारी गारमेंट उद्योगाचा प्रारंभ केला. गारमेंट उद्योगाच्या उद्घाटनासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया आवर्जून उपस्थित होते. यावेळी त्यांनी पोलिसांच्या कामाचे कौतुक केले. मुळेगाव तांडय़ावरील 41 महिलांना जिल्हा उद्योग केंद्र व 'मिटकॉन'च्या साहाय्याने प्रशिक्षण देण्यात आले व त्यांना अत्याधुनिक मशिनही कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहेत. सोमवारी परिवर्तन उद्योगसमूहाचा थाटात नामकरण सोहळा पार पडला. यामुळे परिवर्तनाची एक नवी चाहूल मुळेगाव तांडय़ावर सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे.या परिवर्तनाचा सोहळा झाल्यानंतर दुसऱयाच दिवशी आज या सोहळ्याला गालबोट लागले आहे. हैदराबाद रोडवरील मुळेगाव तांडय़ावर व शहरातील नीलमनगर परिसरात राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱया चौघांना अटक केली. या कारवाईत हातभट्टी दारूसह एक लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचबरोबर नीलमनगर परिसरात कारवाई करीत तिघांना अटक केली असून, हातभट्टीसह एक लाख 79 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक एस. एम. मस्करे, एस. एस. फडतरे व त्यांच्या पथकाने केली आहे.मुळेगाव तांडय़ावरील या दोन्ही घटनांची चर्चा सर्वत्र सुरू आहे. ग्रामीण पोलिसांनी हातभट्टी दारू गाळणाऱया हातांना रोजगार देत नवी दिशा दिल्याचे कौतुक होत असतानाच, पुन्हा हातभट्टी गाळायला सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे.



Reactions

Post a Comment

0 Comments