सोलापूरात २६ ते २८ मार्च 'इलेक्ट्रिक व्हेईकल' चे प्रदर्शन
माझी वसुंधरा अभियान व राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम अंतर्गत सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभाग, इको फ्रेंडली क्लब, इलेक्ट्रिक व्हेईकल डीलर्सचा उपक्रम

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जागतिक हवामान दिनाच्या निमित्ताने माझी वसुंधरा अभियान व राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम अंतर्गत सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभाग आणि इको फ्रेंडली क्लब यांच्यावतीने सोलापुरात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक व्हेईकलचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे.
पेट्रोल आणि डिझेलवर चालणार्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे या उद्देशाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत इलेक्ट्रिक व्हेईकलला प्रोत्साहन देण्याचा निर्णय सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभागाने घेतला आहे. याच अनुषंगाने महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात येत्या 26, 27 आणि 28 मार्च रोजी इलेक्ट्रिक व्हेईकलचे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर शेजारील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहाच्या प्रांगणात होणार आहे. 26 मार्च रोजी सकाळी 10 वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. सकाळी 10 ते रात्री 9 अशी प्रदर्शनाची वेळ असेल. या प्रदर्शनात नीदा इव्ही, राज मोटर्स, डायनामिक इव्ही मोटर्स, मोंढे यो बाइक, चकोले मोटर्स या कंपन्यांचे इलेक्ट्रिक व्हेईकल सोलापूरकरांना प्रत्यक्ष पाहता येणार आहेत. कंपनीच्या प्रतिनिधींकडून इलेक्ट्रिक व्हेईकलची माहिती घेता येणार आहे, अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली. याप्रसंगी महानगरपालिकेचे पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलनकर, इलेक्ट्रिक व्हेईकल डीलर्सचे श्रीनिवास चकोले, बसवराज येरनाळे, सलीम हुंडेकरी, पवन मोंढे, इको फ्रेंडली क्लबचे अजित कोकणे उपस्थित होते.
इलेक्ट्रिक व्हेईकलची रॅली
इलेक्ट्रिक व्हेईकल प्रदर्शनाच्या निमित्ताने शनिवार दि. 26 मार्च 2022 रोजी सकाळी 8 वाजता सोलापुरात इलेक्ट्रिक व्हेईकलची रॅली आयोजित करण्यात आली आहे. प्रशासकीय यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच मान्यवर या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी अधिकाधिक सोलापूरकरांनी इलेक्ट्रिक व्हेईकलचा वापर करावा या अनुषंगाने रॅलीमधून प्रबोधन करण्यात येणार आहे.
0 Comments