नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा विधानसभेत गदारोळ !
विधानसभेचे कामकाज ३० मिनिटांसाठी स्थगित !
मुंबई (कटूसत्य वृत्त):- देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा मागणीसाठी ९ मार्च या दिवशी विधानसभेत विरोधकांनी गदारोळ घातला. विधानसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जाऊन विरोधकांनी घोषणा देऊन नवाब मलिक यांच्या राजीनामाची मागणी केली. सभागृहात गोंधळ वाढल्याने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभेचे कामकाज ३० मिनिटांसाठी स्थगित केले.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचे राजीनामा देण्यासाठी आम्ही सभागृहात वारंवार मागणी केली आहे. सध्या ते कारागृहात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामा तात्काळ संमत करून त्यांना मंत्रिमंडळातून काढावे. सरकार त्यांचे राजीनामा न घेता नवाब मलिक यांच्या पाठीशी रहात आहे. मलिक यांच्या पाठीशी रहाणे म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊदच्या पाठीशी सरकार उभे रहात आहे’, असा विचार समाजात जाईल. त्यामुळे माझी विनंती आहे की, सरकारने मलिक यांचे राजीनामा घेतले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली; मात्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या आमदारांनी या मागणीचा पुनरुच्चार करत विधानसभेत पुन्हा घोषणा देऊन गदारोळ घातला. सभागृहात विरोधक नसतांना विधानसभेचे कामकाज चालूच ! गदारोळानंतर ३० मिनिटे विधानसभेचे कामकाज स्थगित झाल्यानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज चालू झाले, तेव्हा सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांसह भाजपचा एकही आमदार उपस्थित नव्हता. या कारणास्तव नरहरी झिरवळ यांनी लक्षवेधी न घेता इतर विषयांचे कामकाज चालू ठेवले.
0 Comments