Hot Posts

6/recent/ticker-posts

धुलिवंदन; राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली गोव्याची दारु जप्त 76 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त


धुलिवंदन; राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली गोव्याची दारु जप्त
 76 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त
        सोलापूर (कटूसत्य वृत्त):- होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवर 18 मार्च रोजी पहाटे गस्तीदरम्यान एका कंटेनरमधून गोवा राज्याच्या विदेशी दारुच्या 890 पेट्या जप्त करुन एकूण 75 लाख 82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.   
सविस्तर वृत्त असे की, होळी सणानिमित्य धुलीवंदन व रंगपंचमीच्या दिवशी मद्याची मागणी लक्षात घेता गोवा राज्यातून दारुची अवैधरीत्या वाहतूक होण्याची शक्यता पाहता राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली होती. सदर पथकाकडून कर्नाटक-महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर कडक पहारा लावून गस्त घालण्यात येत होती. दिनांक 18 मार्च रोजी  अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक आदित्य पवार, दुय्यम निरिक्षक भरारी पथक सुरेश झगडे व दुय्यम निरिक्षक ब 2 अंकुश आवताडे यांच्या पथकाने जत सांगोला महामार्गावर सोनंद गावाच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास गस्त घालत असतांना एका आयशर कंपनीच्या सहाचाकी कंटेनर क्र.MH-04-GR-7237 मधून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला विदेशी दारुच्या एकूण 890 पेट्या जप्त केल्या. सदर वाहनात एड्रीयल क्लासिक व्हिस्किच्या 750 मिली क्षमतेचे 300 पेट्या, रॊयल स्टॅग विदेशी दारुच्या 180 मिली क्षमतेच्या 100 पेट्या, इंपेरियल ब्ल्यू विदेशी दारुच्या 180 मिली क्षमतेच्या 232 पेट्या, मॅक्डॊवेल नं 1 व्हिस्की विदेशी दारुच्या 180 मिली क्षमतेच्या 258 पेट्या असा 66 लाख 76 हजार रुपये किंमतीचा दारुसाठा जप्त केला. तसेच 2 जुने वापरते मोबाईल व कंटेनर असा एकूण 76 लाख  82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल सदर गुन्ह्यात जप्त केला. कंटेनरचा चालक ज्ञानेश्वर अशोक भोसले, वय 31 वर्षे, रा. पोखरापूर ता. मोहोळ याचे विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात मुख्य आरोपी बापू उर्फ सोमनाथ तुकाराम भोसले, बाळू भोसले, शेखर भोसले व कंटेनर मालकासह इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. 
          सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त श्री कांतीलाल उमाप, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) श्रीमती उषा वर्मा, विभागीय उपायुक्त श्री प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक आदित्य पवार, दुय्यम निरिक्षक भरारी पथक सुरेश झगडे, दुय्यम निरिक्षक ब 2 अंकुश आवताडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी. आर. होळकर, जवान वेळापूरे, पांढरे, कर्चे,चेतन व्हनगुंटी, सावंत, लुंगसे, जवान नि वाहन चालक डी.एम.वाघमारे, महिला जवान पी.बी.कुटे  यांच्या पथकाने पार पाडली.
         या विभागाकडून अवैधरित्या सोलापूर जिल्ह्यात चोरट्या मार्गाने होणाऱ्या वाहतुकीवर विशेष पथके नेमून विशेष लक्ष ठेवले जात असून सोलापूर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री, निर्मिती, वाहतूकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत.
       सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू निर्मिती/ वाहतूक/ विक्री/ साठा, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास या विभागास तात्काळ संपर्क साधावा. बातमीदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
Reactions

Post a Comment

0 Comments