अपघातस्थळी पोहोचण्यासाठी केंद्रस्तरीय यंत्रणा उभारा
अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या सूचना
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):-जिल्ह्यात अपघातात मरणारे, गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. रस्ते अपघात झाल्यास पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी समन्वयाने काम करायला हवे. सर्वांच्या समन्वयासाठी आणि अपघातस्थळी लवकर पोहोचण्यासाठी एक केंद्रस्तरीय यंत्रणा उभा करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जाधव बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, महावितरणचे कार्यकारी अभियंता एस.आर. शिंदे, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे महेश येमुल, राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता ए.पी. देवकाते यांच्यासह समितीमधील सदस्य उपस्थित होते.जाधव यांनी सांगितले की, रस्त्यावर अपघात घडल्यानंतर आपली सर्व विभागाची टीम 48 तासांच्या आत पोहोचून अपघात घडल्याचे कारण जाणून घेतात. पुन्हा त्याठिकाणी अपघात घडू नये, यासाठी कार्यवाही करतात. मात्र अपघात घडल्यानंतर जखमींना त्वरित मदत पोहोचली तर त्याचे प्राण वाचू शकतात. म्हणून सर्व विभागाच्या सहकार्याने एक केंद्रबिंदू मानून यंत्रणा उभी करायला हवी. या यंत्रणेकडे रूग्णवाहिका, क्रेन आणि इतर आवश्यक साधन सामग्री असायला हवी.ग्रामीण भागात सतत अपघात घडणाऱ्या ब्लॅक स्पॉटपैकी 8 ब्लॅक स्पॉटवर काम पूर्ण झालेले नाही, त्वरित यावर कार्यवाही करावी. प्रत्येक वाहनाच्या वेगाची गती कोणत्या ठिकाणी किती असावी, याचे मोठ्या अक्षरातील फलक टोलनाके आणि अन्य मोक्याच्या ठिकाणी लावावेत. प्रत्येक 10 किमी अंतरावर हे फलक असावेत. वळणाच्या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या लावल्यानंतर अपघात कमी होतील. अपघात होणाऱ्या ठिकाणी कॅम्बर्स लावावेत, अशा सूचनाही जाधव यांनी संबंधितांना केल्या.रस्ते दुरूस्ती आणि इतर कामे सुरू असलेल्या ठिकाणी अपघात होत असल्याने कामापासून दोन-तीन किमीपासूनच सूचना फलक लावावेत, असेही त्यांनी सांगितले.अपघात कमी करण्यासाठी प्रत्येक विभागाने सहकार्य करण्याची गरज आहे. जिथे अपघात होतात, अशा ठिकाणांची सर्व विभाग पाहणी करून त्यावर अंमलबजावणी करतात. चौकात वाहतूक फलक रंगीत सजावटीचे केले तर वाहतूकदारांना फायद्याचे होईल, दुभाजक महत्वाचा असून यामुळे रस्ते ओलांडताना होणारे अपघात टाळले जातील, असे श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.
0 Comments