पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार व्हावीत – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई (कटूसत्य वृत्त):- मुंबईत विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेली विकास आणि पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.श्री.ठाकरे यांच्या हस्ते आज वरळी परिसरातील नेहरू सायंस सेंटर जंक्शन, फिनिक्स मुंबई माईल फ्लायओव्हरखालील जागा, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, सायानी रोड, गोखले रोड, एनी बेझंट रोड वरील सौंदर्यीकरण आणि फुटपाथच्या कामांचे तसेच सर पोचखानवाला रोड व खान अब्दुल गफार खान रोडला जोडणाऱ्या पायवाटेच्या (हिलटॉप लेन) सौंदर्यीकरण व नूतनीकरणाच्या कामांचे भूमीपूजन झाले. या कामांना आजपासूनच सुरूवात होत आहे. यावेळी नगरसेवक स्नेहल अंबेकर, समाधान सरवणकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनिल शिंदे, महापालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.मुंबईच्या विकासात सर्वांचा सहभाग असावा या श्री.ठाकरे यांच्या आवाहनानुसार आज भूमीपूजन होत असलेली कामे राज्य शासन, मुंबई महानगरपालिका यांच्या निधीसह फिनिक्स मिल्स, आदित्य बिर्ला ग्रुप यांच्या सीएसआर निधीमधून करण्यात येणार आहेत. या कामांची पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे यांनी माहिती घेतली. या परिसराचे सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करताना टाकाऊ पदार्थांपासून सुंदर कलाकृती निर्माण करून त्यांचा वापर करण्यात येणार आहे. त्यांचीही पाहणी करून श्री.ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले.महानगरपालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी श्री.ठाकरे यांना येथे करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली.
0 Comments