मातोश्री विद्यालयाच्या पारावरची शाळा व गृहभेट या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण

कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- सद्संकल्प शिक्षण व समाजसेवा संस्था सोलापूर या संस्थेचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या प्रेरणेतून व संकल्पनेतून उदयास आलेला पारावरची शाळा व विद्यार्थ्यांची गृहभेट हा उपक्रम मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगांव ता.माढा येथे शैक्षणिक वर्ष सन 2021/2022 या वर्षांमध्ये राबविण्यात येत आहे. पारावरची शाळा या उपक्रमामध्ये गावातील दहा-बारा विद्यार्थी एकत्रीत करून त्यांचा अभ्यास घेणे,अभ्यासातील शंका निरसन करणे, गृहभेट या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणे व त्यांच्या अभ्यासा संदर्भातील काही अडचणी असेल तर त्यांच्या अडचणी सोडवणे,त्यांना मार्गदर्शन करणे अशाप्रकारे या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण व शाळा विद्यार्थ्यांच्या दारी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला गावातील विद्यार्थी,पालक उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत असून त्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राबविण्यात येत असलेल्या उपक्रमामुळे विद्यालयाचे गावातील जेष्ठ नागरिक आजी-माजी विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक कौतुक करत आहेत. या उपक्रमाचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद पंजाबराव वर ,सुशीलचंद्र भालशंकर यांनी व त्यांचे सहकारी सहशिक्षक भारत कापरे , ज्ञानेश्वर धांडे, एकनाथ रिकिबे व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी केले.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments