Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज येथे सुरू असलेल्या उपोषणात नारी शक्तीचा आक्रोश...

        अकलूज येथे सुरू असलेल्या उपोषणात नारी शक्तीचा आक्रोश...        

भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले समर्थन 

अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथे  सुरू असलेल्या  उपोषणात  नारीशक्तीचा आवाज दणाणला.भाजपाच्या महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची शासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी व शितलदेवी मोहिते-पाटील यांची भावूक साद हे आजच्या उपोषणाचे वैशिष्ठ्य ठरले. हासूड व काठ्या दाखवत उपस्थित महिलांनी महाराष्ट्र शासनाचा निषेधही केला.

अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या मागणीसाठी तीनही गावच्या नागरिकांनी दिनांक 22 तारखेपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या सहाव्या दिवशी आज भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सदिच्छा भेट देऊन समर्थन केले.यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहीते पाटील, भाजपाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहीते पाटील, जि.प.सदस्या शितलदेवी मोहिते-पाटील, कु.ईशिता मोहिते-पाटील, जि.प.सदस्या सुनंदा फुले, अकलूजच्या सरपंच पायल मोरे, नातेपुतेच्या सरपंच कांचन लांडगे, पं.स.सदस्या हेमलता चांडोले, ग्रा.पं.सदस्या रेश्मा गायकवाड, निता शिवरकर, माजी पं.स.सदस्या फातिमा पाटावाला, माळशिरस तालुका महिला अध्यक्षा कल्पना कुलकर्णी, भाजप तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर उपस्थित होते.

यावेळी चित्रा वाघ यांची आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थित शेकडो महिलांशी भाषणातूनच संवाद साधला. सरकार किती नाकर्ते आहे पटवून सांगताना त्यांनी शेतकरी आंदोलन, मराठा आंदोलन, ओबीसी आंदोलन अशी उदाहरणे दिली. अकलूज नगरपरिषदेबाबत बोलताना त्यांनी महाराष्ट्र शासन, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच पालकमंत्र्यांवर चांगलेच ताशेरे ओढले. हे शासन गेंड्याच्या कातड्याचे आहे. त्यामुळे आपली मागणी आक्रमकपणेच लावून धरावी लागणार आहे. शासन आपल्याकडे येत नसेल तर आपण त्यांच्याकडे जावू असे सांगतानाच सर्व महिलांनीही आपल्या हक्कासाठी प्रसंगी मुंबईत जावून आंदोलन करण्याची तयारी ठेवावी अशी सूचना वाघ यांनी केली.

जि.प.सदस्या शितलदेवी मोहिते-पाटील यांना आपले मनोगत व्यक्त करताना अश्रू अनावर झाले, गेल्या सहा दिवसापासून 78 वय असतानाही राज्याचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयदादा उपोषणात सहभागी होतात, अकलूज, माळेवाडी व नातेपूते येथील नागरीक, अबाल, वृध्द उपोषण करत आहेत तरी देखील शासनाकडून अथवा त्यांच्या प्रतिनिधीकडून साधी विचारपूसही होत नसल्याचे सांगतानाच त्या भावूक झाल्या. फक्‍त विरोधाला विरोध करू नका. राजकारण बाजूला ठेवून जनतेचा विचार करा तुमच्या राजकारणामुळे सामान्य जनता भरडली जात असल्याचे भावूक उद‍्गार त्यांनी यावेळी काढले.

आ.राम सातपुते यांनी महाराष्ट्र शासन व राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टिका केली, अकलूज-माळेवाडी व नातेपूते ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीच्या विचारांची असल्याने राष्ट्रवादी मुद्दाम दुर्लक्ष करत आहे. राष्ट्रवादीची ही भूमिका दुर्देवी असून हा गोरगरीबांवर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले.

आज इंडियन मेडीकल असोसिएशन अकलूज, अकलूज-माळेवाडी वकिल संघटना, होमिओपॅथीक डॉक्टर असोसिएशन, शहीद जवान जयहिंद मस्के व्यापारी संकुल गाळे धारक, ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने उपोषणास पाठींबा असल्याचे निवेदन देण्यात आले. सायंकाळी 5 वाजता प्रांतअधिकारी शमा पवार यांनी निवेदन स्विकारले.

दि. 28 जून रोजी सतिशराव माने-पाटील, ग्रा.पं.सदस्या शितलदेवी माने-पाटील, कु.ईशिता मोहिते-पाटील, पं.स.सदस्या हेमलता चांडोले, ग्रा.पं.सदस्या वैष्णवी दोरकर, ग्रा.पं.सदस्या प्रियंका माने, ग्रा.पं.सदस्या सनम मुलाणी, सुभद्रा वाईकर, स्वाती जगताप यांच्यासह कापड असोसेशन, एकता गणेशोत्सव मंडळ, काझी गल्ली, महावीर पथ येथील नागरीक उपोषणात सहभागी होणार आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments