मोहोळच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आणखी निधी खेचून आणणार
जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांची ग्वाही , सीमा पाटील यांच्या प्रभाग पंधरामध्ये चार कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ
मोहोळ ( कटुसत्य वृत्त ) :- सोलापूर सारख्या चाळीस चाळीस हजार लोकसंख्येच्या प्रभागाच्या अनेक नगरसेवकांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करूनही काही कोटींचा निधी मिळवणे कठीण काम आहे. मात्र मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव झटणारे जेष्ठ शिवसेना नेते दिपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विकासासाठी कार्यतत्पर असलेल्या शिवसेना नगरसेविका सीमा पाटील यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष सहकार्याने प्रभाग 15 साठी तब्बल चार कोटी रुपयांचा विकास निधी खेचुन आणला आहे. यापुढील काळातही मोहोळ शहरातील उर्वरित शिवसेना प्रभागासाठी आवश्यक त्या प्रमाणात विकासनिधी मंजूर करून आणण्यासाठी आणि स्वतः वचनबद्ध राहणार आहे अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी मोहोळ येथे दिली.
मोहोळ नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक पंधराच्या शिवसेना नगरसेविका सीमा पाटील यांनी आपल्या प्रभागासाठी शिवसेनेच्या माध्यमातून नगरविकास विभागाकडून मंजूर करून आणलेल्या चार कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ जिल्हा प्रमुख गणेश वानकर आणि ज्येष्ठ शिवसेना नेते दीपक गायकवाड यांच्या हस्ते समर्थ नगर येथे झाला. त्यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना गणेश वानकर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड, तालुका प्रमुख अशोक भोसले, माजी उपसभापती तथा शिवसेना मार्गदर्शक बाळासाहेब गायकवाड, प्रभागाच्या नगरसेविका तथा कार्यक्रमाचे संयोजक सीमा पाटील, नगरसेवक सत्यवान देशमुख सिकंदर बोंगे, अनिता सोनटक्के, युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, शिवरत्न गायकवाड, राजरत्न गायकवाड, नागेश वनकळसे त्यादीसह शहरातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, व नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी प्रभाग क्रमांक पंधरा मधील विविध रस्ते आणि इतर विकास कामांचा विधिवत शुभारंभ उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाला. त्यानंतर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांचा पक्षसंवाद मेळावा समर्थनगर येथे करोनाच्या महत्वपूर्ण पार्श्वभूमीवर सुरक्षित डिस्टन्स पाळून आयोजित करण्यात आला होता.यावेळी व्यासपीठावर मोहोळ शहरातील सर्व पदाधिकारी आणि सर्व शिवसेना नगरसेवक उपस्थीत होते.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाप्रमुख वानकर म्हणाले की ज्या वेळेस मी या विविध कामाचा शुभारंभ करत होतो तेव्हा सदरचा भाग हद्दवाढ असल्याचे जाणवले. हद्दवाढ भागात सतत वाढत जाणारा भाग असतो. त्या ठिकाणी रस्ते पाणी आरोग्य समस्या नेहमी असतात. त्या सुविधा नवीनच तयार कराव्या लागत असतात. चार कोटीचा निधी सीमाताई पाटील यांना सहजासहजी मिळाला नाही. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत निश्चितपणे एका लढवय्या आणि कडव्या शिवसैनिकाला शोभेले अशी आहे. प्रभाग पंधराच्या धर्तीवर ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड यांनी संपूर्ण मोहोळ शहरासाठीही मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणावा. यासाठी लागेल ते सहकार्य देण्यासाठी मी सदैव तयार आहे असे अभिवचन देखील यावेळी गणेश वानकर यांनी दिले. हद्दवाढ भागाचा विकास करण्याचे आव्हान सीमा पाटील यांनी स्वीकारले आणि ती यशस्वीरीत्या पेलले देखील. त्यामुळेच प्रभाग क्रमांक पंधरा हा मोहोळ शहरातील एक विकासाचं एक आदर्श मॉडेल बनला आहे.
यावेळी जेष्ठ नेते दीपक गायकवाड यांनी गत नगर परिषद निवडणुकीची आठवण सर्वांना करून दिली. या निवडणुकीत सर्वात जास्त जागा शिवसेनेने जिंकूनही केवळ निवडणूक काळात समन्वय नसल्यामुळे सत्तेपासून आपणा सर्वांना दूर राहावे लागले. आता या वेळी अतिशय चांगली संधी असून सर्वांनी एकदिलाने कामाला लागून मोहोळ नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवूया असे आवाहन ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड यांनी यावेळी केले. शिवसेना नगरसेविका सीमाताई पाटील यांनी प्रभाग 15 हा विकासाचा बालेकिल्ला तर बनवलाच मात्र आता हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला नक्कीच होणार आहे असे गौरवोदगार दिपक गायकवाड यांनी काढले.
प्रभाग क्रमांक पंधराच्या सर्वांगीण विकासाचा दिलेला शब्द मी पूर्ण करत असल्याचा आनंद मला होत आहे. प्रभागासाठी निधी मिळवण्यासाठी जिल्हा प्रमुख गणेश वानकर आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमोल सहकार्य केले. ज्या दिवशी माझ्या प्रभागातील विकास कामांना चार कोटींना निधीची मंजुरी मिळाली ती गोष्ट माझ्यासाठी आयुष्यातील एक सर्वोच्च आनंदाची गोष्ट होती. मी पाण्याच्या समस्येबाबत कधीही हा माझा प्रभाग हा परक्याचा प्रभाग अशी भूमिका घेतली नाही. माझ्या लगतच्या असलेल्या प्रभागात देखील रस्ते पाणी आरोग्य समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत.
सीमा पाटील
शिवसेना नगरसेविका प्रभाग क्रमांक 15
0 Comments