करमाळा वन विभागामार्फत शेतकऱ्यांना सेंद्रीय खतांचे व अवजारांचे वितरण
करमाळा ( कटूसत्य वृत्त ) :- माळढोक पक्षी (वन्यजीव ) अभयारण्य करमाळाद्वारे शेतकऱ्यांना सेंद्रीय खते व अवजारे वितरण तसेच 'वनवणवा प्रबोधन ' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महात्मा फुले समाजसेवा मंडळ पोथरे चे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. गणेश भाऊ करे-पाटील व टायगर गृप महाराष्ट्र चे अध्यक्ष तानाजी जाधव हे मान्यवर होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांना वृक्ष रोपे भेट देऊन सन्मान करण्यात आला. कोविड 19 संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर शासनाच्या आरोग्य सूरक्षाविषयक मार्गदर्शक नियमांचे काटेकोर पालन करुन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती शितल नगराळे यांनी कार्यकमाचे प्रास्ताविक केले. त्यामधून त्यांनी कार्यकमाचा उद्देश व शासनाच्या विविध योजना यांबद्दल माहिती दिली. पुढे बोलताना श्रीमती नगराळे यांनी शेतीची सुपिकता अबाधीत ठेऊन उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर करणे शेती व शेतकऱ्यांसाठी हीताचे असून रासायनिक खतांच्या दूष्परीणामांचे संकट टाळता येऊ शकेल असे मत व्यक्त केले. तसेच वनांना आग लागण्याच्या घटना घडू नयेत यासाठी मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांनी वन विभागास सहकार्य करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर करताना गणेश भाऊ करे-पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी काळाची पाऊले ओळखून शेतीमध्ये आधुनिकतेचा व नविन तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला हवा. चिकीत्सक व प्रयोगशिल शेतकरी बनून आपली प्रगती साधली पाहिजे. उत्पादन वाढीसाठी वापरली जाणारी रासायनिक खते ही अत्यंत घातक असून यातील हानीकारक व विषारी घटक मृदा प्रदुषित करतात व पिकांद्वारे आपल्या आहारातून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम करतात त्यामुळे दुष्परिणाम टाळण्यासाठी विषमुक्त शेतीच्या पर्यायावर गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे असे मत व्यक्त करून करमाळा वन कार्यालया मार्फत राबविण्यात येत असलेले वैविध्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले.टायगर गृप महाराष्ट्र अध्यक्ष तानाजी जाधव यांनी वन विभागाला आपले पूर्ण सहकार्य राहील असे जाहीर करून , संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वृक्षारोपन, वन्यजीवांसाठी टँकरने पाणी व्यवस्था व अन्य सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येत गट शेती करण्याचे आवाहन केले. एक संघ प्रयत्नांतून समस्या सोडविता येतात. यावेळी त्यांनी डोळसपणे शेती न करण्यामुळे शेती खर्चीक व तोटयाची होत असल्याचे मत व्यक्त केले. यासाठी शेतकऱ्यांनी पिकांसाठी तज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्यायला हवे असे सांगत सेंद्रीय शेतीची आवश्यकता यावर आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पक्षीमित्र कल्याणराव साळुंके यांनी केले तर वनरक्षक गणेश झिरपे यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. यावेळी वन विभागाचे वनपालश्रीमती दीपाली शिंदे, वनपाल कांतीलाल चेंडगे,वनरक्षक इरफान काझी, वनरक्षक गणेश झिरपे, संभाजी होनप, राजेंद्र जगताप , आर.बी. शेख, पी.डी. गाडे, आर.जी.रेगुडे, एल.बी.गाडे, एस.पी. कांडेकर, एम.टी.शेख, जगन्नाथ शिंदे, बालाजी शिंदे, सातव, पवळ, व लाभार्थी शेतकरी तसेच टायगर गृपचे सदस्य उपस्थित होते.
0 Comments