Hot Posts

6/recent/ticker-posts

बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवू नका

बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवू नका

          मुंबई, (कटूसत्य वृत्त): राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत. काही समस्या असेल तर पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरित संपर्क करुन त्याची माहिती द्यावी, असे आवाहन पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी जनतेस केले आहे.

          श्री.केदार म्हणाले, मुंबई येथे ३ कावळे, ठाणे येथे १५ बगळे (इंग्रेटस) व २ पोपट या पक्षांचे तसेच परभणी येथे एका कुक्कुटपालन फार्ममधील ८०० पक्षांचे, दापोली येथे ६ कावळे व बीड येथे ११ कावळ्यांचे मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने त्यांचे नमुने तपासण्यांचे काम सुरू आहे. तसेच सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील निशाद प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणीचे निष्कर्ष हाती येण्यास ४८ ते ७२ तास लागू शकतात.

          श्री. केदार यांनी सर्व पोल्ट्रीधारक तसेच सर्वसामान्य जनतेस कळविले की, राज्यातील कोणत्याही गावामध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरित होणाऱ्या पक्षांमध्ये मृतक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृतक झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजीकच्या पशु वैद्यकीय दवाखान्यामध्ये याची माहिती द्यावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरित संपर्क करुन त्याची माहिती द्यावी. मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये.

          आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात बर्ड फ्लू रोगामुळे पक्षांची मृतक झाल्याचे आढळून आलेले नाही. तरीही उपरोक्तप्रमाणे दक्षता घेणे आवश्यक आहे. परंतु अंडी व कुक्कुट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. महाराष्ट्रात यासंदर्भात सध्या चिकन व अंडी यांच्या विक्रीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आलेले नसल्याचे श्री. केदार यांनी यावेळी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments