भाजपा महिला मोर्चाच्या वतीने तहसीलदार बालाजी बनसोडे यांना निवेदन देण्यात आले

अक्कलकोट, दि.१२(क.वृ.): अक्कलकोटला आज सोमवारी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव आज आंदोलन छेडून नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रात तीन पक्षाचे तसेच मोठा विकास करण्याचे ठरवून एकत्र आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मूळ विषय बाजूला राहून महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरुच आहे. त्यातच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्रही काही केल्या थांबेना झाले आहेत. भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश यांनी प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला. पीडित महिलांच्या कुटुंबीयांना, स्थानिक पोलिस स्टेशनला भेट देऊन वेळोवेळी कारवाईची मागणी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदर घटनांबद्दल निवेदन पाठविले. सदर निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला साधा विधायक प्रतिसाद देण्याची शिष्टाई देखील मुख्यमंत्र्यांनी दाखविली नाही. यावरुन हे सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हेच स्पष्ट होते. या सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळे प्रशासनदेखील महिला अत्याचारांच्या सदर घटनांना गांभीर्याने घेत नाही.
वरीलप्रमाणे सर्व वस्तुस्थिती असल्यामुळे भाजपा महिला मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशतर्फे ता.२२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड सेंटर्स व हॉस्पिटल्स मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी एक दिवसीय आंदोलनही करण्यात आले होते.यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी,महेश हिंडोळे, महिला आघाडीच्या सुरेखा होळीकट्टी,सोनाली शिंदे,उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे,अक्कलकोट तालुका भाजप अध्यक्ष मोतीराम राठोड,शिवशरण जोजन, बसवंत कलशेट्टी,रमेश कापसे, विक्रम शिंदे, शिवशंकर स्वामी, दीपक जरीपटके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments