प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्याचे कार्यादेश तातडीने देण्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे निर्देश |

मुंबई, दि.६(क.वृ.): पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात येतात. मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांमधील कार्ला प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे कार्यादेश देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
मंत्रालयात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गावांमध्ये कार्यवाही सुरु असलेल्या सहा योजनांबाबतची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला आमदार सुनील शेळके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य अभियंता श्री. गजभिये यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, मावळ तालुक्यातील गावांसाठीच्या योजना नियोजित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. डोंगरगाव आणि कुसगाव गावात सुरु असलेल्या प्रादेशिक योजनेबाबतची निविदा काढणे आणि इतर तीन प्रादेशिक योजनांना तांत्रिक मान्यता देण्याबाबतचे आदेश प्राधान्याने देण्यात यावेत. देहू रोड आणि कॅन्टॉनमेंट बोर्ड पाणीपुरवठा योजनेबाबत कार्यादेश देण्याबाबतची कार्यवाही संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पूर्ण करावी, असे निर्देशही श्री. बनसोडे यांनी दिले.
0 Comments