सांगोला मतदार संघातील सर्व प्रलंबित विकास कामे पूर्ण करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सांगोला दि.२९(क.वृ.):- सोमवार दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा येथील शासकीय निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्रातील सात शिवसेना आमदारांची बैठक पार पडली, यावेळी बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना आमदारांच्या विकासकामांबाबत चर्चा करून सर्व प्रलंबित विकास कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना राज्याच्या प्रधान सचिवांना दिल्या, या बैठकीसाठी आमदार शहाजीबापू पाटील, प्रकाश आबिटकर, महेश शिंदे, अनिलराव बाबर, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, वस्त्रोद्योग राज्य मंत्री राजेंद्र यड्रावकर, परिवहन मंत्री अनिल परब, शिवसेना सभागृह मुख्य प्रतोद सुनील प्रभू व खासदार अनिल देसाई यांच्यासह राज्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित असणाऱ्या सात प्रमुख मागण्या मांडल्या.
- सन १९९८ साली मंजूर होऊन सन २०१२ साली अंदाजपत्रक तयार होऊन सुद्धा अद्याप सुरू न झालेली बहुचर्चित सांगोला उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन सांगोला तालुक्यासाठी मंजूर असलेले उजनीचे दोन टीएमसी पाणी मिळण्यासाठी अंदाजे २०० कोटी रुपयांच्या या योजनेसाठी त्वरित अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून काम सुरू करण्यात यावे.
- टेंभू, म्हैसाळ, बुद्धेहाळ व आटपाडीच्या कामथ तलावातून सांगोला तालुक्यातील पाण्यापासून वंचित असलेल्या सुमारे २६ गावांना या योजनांमध्ये समाविष्ट करून सुमारे शंभर कोटी खर्चाच्या या कामांना तातडीने मंजुरी देऊन या गावांना पाणी मिळावे.
- सांगोला तालुक्यामध्ये शेतीपंपांची ग्राहक संख्या सुमारे ८५००० इतकी आहे शासनाच्या निकषानुसार ३०००० ग्राहक संख्येला एक उपविभागीय कार्यालय असणे बंधनकारक असल्यामुळे जवळा व हातीद या दोन ठिकाणी महावितरणाच्या अजून दोन नवीन उपविभागीय कार्यालयांना त्वरित मंजुरी देऊन काम सुरू करावे.
- दिनांक १६ व १७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी मध्ये सांगोला मतदारसंघातील सांगोला व पंढरपूर तालुक्यातील शेतीचे घरांचे व रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे याचे पंचनामे पूर्ण झाले असून नुकसानग्रस्तांना तातडीने जास्तीत जास्त भरपाई देण्यात यावी.
- आशियाई विकास बँकेकडून अर्थसहाय्य मंजूर असलेला सांगोला मतदार संघातील मंगळवेढा पारे जत ते जिल्हा हद्द या राज्यमार्गावरील २२ किमी अंतर असणारा व सुमारे १०० कोटी रुपये खर्चाच्या कामाला त्वरित मंजुरी देऊन काम सुरू करावे.
- सांगोला शहरासाठी बऱ्याच वर्षांपासून मागणी असलेली भुयारी गटार योजनेला मंजुरी देऊन नगरोत्थान व रस्ते निधीला जास्तीत जास्त पैसे उपलब्ध करून द्यावेत.
- सांगोला तालुक्यासाठी सांगोला येथे सर्व शासकीय कार्यालयासाठी नविन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,बीओटी तत्त्वावर सांगोला बस स्थानकाचे व्यापारी संकुलासह नवीन अद्यावत बसस्थानक बांधणे व शंभर वर्षे जुने असलेले इंग्रज कालीन शासकीय विश्रामगृह पाडून त्याजागी दोन अती महत्वाच्या व चार महत्वाच्या कक्षा सहित मोठी बैठक व्यवस्था असलेले सुमारे पाच कोटी खर्चाचे नवीन शासकीय विश्रामगृह उभा करावे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व मागण्या तपशीलावर समजून घेऊन प्रत्येक मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे प्रधान सचिव यांना दिल्या व मी सांगोला येथे निवडणुकीवेळी जो शब्द जनतेला दिला आहे त्याची मला पुर्ण आठवण असून या सर्व मागण्या मी मान्य करत आहे व लवकरच मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न व इतर सर्व विकासकामांना भरीव निधी देऊन कामे पूर्ण करण्याचा शब्द आमदार शहाजीबापू पाटील यांना दिला.
0 Comments