अकलूज ग्रामपंचायतीच्या वतीने भक्तीमय वातावरणात सार्वजनिक गणेश विसर्जन

अकलूज दि.१(क.वृ.): कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पहाता अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज ग्रामपंचायतीच्या वतीने मोठया भक्तीमय वातावरणात सार्वजनिक व घरगूती गणेश मृतींचे विसर्जन नीरा नदीच्या घाटावर करून गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला.
जगाच्या पाठीवर कोरोना विषाणूने कहर केला असून त्याने कित्येकांचे जीवन उध्वस्त केले आहे. गेली पाच सहा महिने आपले शासन, प्रशासन, डॉक्टर यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, लोक प्रतिनिधी, जीवाची पर्वा न करता या संकटावर मात करण्यासाठी अहोरात्र उपाययोजना करण्यात व्यस्त आहेत.अशा परिस्थितीमुळे सर्व सन उत्सव नागरिकांनी अत्यन्त साध्या पध्दतीने घरातच साजरे केले. तर सर्वात मोठा असणारा गणेशोत्सवही विना मिरवणूक, वाजत-गाजत न करता, अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पहाता अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. याला आळा घालण्यासाठी अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस यंत्रणा यांच्या सहकार्याने अकलूज ग्रामपंचायतीने एकाच वेळी घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जन भक्तीभावात पूजा आरती करून नीरा नदीत केले व गणपती बाप्पांना निरोप दिला.
याकरिता अकलूज ग्रामपंचायतीने अकलूजच्या प्रत्येक वार्डात वहान फिरवून अखंड दिवस गणेश मूर्तीचे संकलन करीत होते. यावेळी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी गणेश मूर्ती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केल्या. तर अकलूज ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठया भक्तीभावात सार्वजनिकपणे पूजा आरती करून गणेश मूर्तींचे नीरा नदीत विसर्जन करून कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्याचा प्रयत्न केला.
0 Comments