Hot Posts

6/recent/ticker-posts

पाणीपुरवठा योजनांचा सुधारित प्रस्ताव १५ दिवसात विभागाला सादर करावा – राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे निर्देश

पाणीपुरवठा योजनांचा सुधारित प्रस्ताव १५ दिवसात विभागाला सादर करावा – राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे निर्देश


मुंबई, दि.३०(क.वृ.): लातूर जिल्ह्यातील २७ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा सुधारित प्रस्ताव १५ दिवसात विभागाला सादर करण्याबरोबरच, नगरपरिषदांच्या पाणीपुरवठा योजना ३१ मार्च २०२१ पूर्वी पूर्ण कराव्यात, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

लातूर जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा मंत्रालयात आढावा घेण्यात आला. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त उदय टेकाळे, पाणी पुरवठा विभागाचे विशेष कार्य अधिकारी श्री.गजभिये, औरंगाबादच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता श्री. लोलापोड यांच्यासह संबंधित अधिकारी आणि जिल्हयातील सर्व नगरपालिकांचे मुख्य अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या जलजीवन अभियानाची अंमलबजावणी कालबध्द पध्दतीने होणे आवश्यक आहे. लातूर जिल्हयात सध्या सुरु असलेल्या योजनांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण होण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे.

यावेळी राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी जलजीवन अभियानमधील नियोजन, योजनांची सद्यस्थिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत राबविण्यात येणाऱ्या नागरी पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनांच्या कामांचा आढावाही यावेळी घेतला.

Reactions

Post a Comment

0 Comments