प्राचार्य डॉ.महेंद्र कदम यांच्या 'तणस' कादंबरीस रेंदाळकर पुरस्कार जाहीर

माढा दि.७(क.वृ.):- कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ येथील कविवर्य ए. पां. रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा कादंबरीसाठीचा पुरस्कार माढा तालुक्यातील वडशिंगेचे रहिवासी व टेंभुर्णीच्या विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांच्या 'तणस' साठी जाहीर झाला असून यापूर्वीच्या 'धूळपावलं'' आणि 'आगळ" या कादंबऱ्यांनंतर लोकवाङमय गृह मुंबई यांच्याकडून 'तणस 'ही त्यांची तिसरी कादंबरी प्रकाशित झाली आहे.
आजच्या संभ्रमित पिढीच्या वर्तमान काळाला कवेत घेणारी ही कादंबरी म्हणजे अपेक्षाभंगाची भळभळती जखम घेऊन वावरणा-या पिढीची कथा आहे. समाजातल्या विविध स्तरांतले तरुण संघर्ष करताना यात पहायला मिळतात. तणसच्या रूपाने 'वाहनतळ' मराठी कादंबरीत पहिल्यांदाच अवतीर्ण झाला आहे. जिवंत आणि प्रत्ययकारी चित्रणातून 'तणस 'च्या रूपाने प्रगल्भ आणि वेगळी अनुभूती वाचकांना येते.रोख रक्कम,सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.या पुरस्कार निवड समितीसाठी सोलापूरचे प्रसिद्ध समीक्षक डॉ.रणधीर शिंदे,डॉ.गिरीश मोरे आणि डॉ.रफीक सूरज यांनी कामकाज पाहिले तर वाचनालयाचे अध्यक्ष आर. एम.पाटील यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे.
या पुरस्काराबद्दल संस्थापक-अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे,आमदार संजयमामा शिंदे,जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे,सभापती विक्रमसिंह शिंदे,सचिव पोपट खापरे, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके,जेष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र दास,इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे,डॉ.संतोष कदम, डॉ.नेताजी कोकाटे,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,मार्केट कमिटीचे उपसचिव शहाजी कदम,कार्यालयीन अधीक्षक विजय उपासे,मिलिंद भोसले यांच्यासह प्राध्यापक व मित्रमंडळींनी अभिनंदन केले.
0 Comments