Hot Posts

6/recent/ticker-posts

तर आज आरक्षणाला स्थगिती मिळाली नसती- धैर्यशील मोहिते पाटील

तर आज आरक्षणाला स्थगिती मिळाली नसती- धैर्यशील मोहिते पाटील 

अकलूज दि.१०(क.वृ.): सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले पाहिजे ही भूमिका घेऊन त्या अनुषंगाने अतिशय गंभीरपणे मांडण्यास केलेला उशीर व हवी तितकी तत्परता न दाखविल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली. त्यामुळे मराठा समाजातील घटकांना फटका बसणार आहे. यास सर्वस्वी महाविकास आघाडीचे शासन जबाबदार आहे. तसेच ही मराठा समाजाची फसवणूक आहे असे म्हणत भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीवर टिका केली.                

धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे शैक्षणिक व नोकरीत आरक्षण राहणार नाही. यामुळे समाजाचे अतोनात नुकसान होणार आहे. मी पाठीमागे वारंवार सांगितले की, मराठा आरक्षणास स्थगिती मिळू नये यासाठी राज्य सरकारने कोणतीही तयारी केली नव्हती. सरकारची खरंच आरक्षण टिकविण्याची मानसिकता असती तर आज आरक्षणाला स्थगिती मिळाली नसती. ही सकल मराठा समाजाची शुद्ध फसवणूक केली आहे. तसेच मोहिते पाटील यांनी सारथी संस्थेला सुद्धा तुटपुंजी मदत करत मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत असे सांगत एकदंरीत सरकार मराठा समाजाच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचे सांगितले. शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास कायद्याअंतर्गत मराठा समाजाला माजी मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या काळात आरक्षण देण्यात आले होते. हे आरक्षण टिकविण्याची जबाबदारी महाविकास आघाडीची होती. पण सरकारने जाणीवपूर्वक आरक्षणाचा प्रश्न किचकट केलेला आहे.असेही धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले.

Reactions

Post a Comment

0 Comments