विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत 3 कोव्हीड केअर सेंटरला ऑक्सीजन मशीन सुपुर्त

माढा दि.१४(क.वृ.):- माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार बबनदादा शिंदे यांच्या पुढाकारातून माढा येथील तुळजाभवानी मंगल कार्यालयातील कोव्हिड केअर सेंटरला 1 तर कुर्डूवाडी येथील श्रीराम व संकेत मंगल कार्यालयातील कोव्हीड केअर सेंटरला प्रत्येकी 1 ऑक्सीजन मशीन कारखान्याचे संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते गटविकासाधिकारी डॉ.संताजी पाटील यांच्याकडे 14 सप्टेंबर रोजी सुपुर्त केल्या.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले की, माढा तालुक्यात 3 कोव्हिड केअर सेंटर सुरू असून याठिकाणी ऑक्सिजन अभावी एकही रुग्ण दगावू नये म्हणून कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल रुग्णांपैकी ज्या रुग्णांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत त्यांना या मशिनच्या सहाय्याने ऑक्सीजन पुरविला जाणार आहे.या मशीनमुळे रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार असून हवेतील ऑक्सिजन घेऊन तो रुग्णांना पुरवठा करता येतो त्यामुळे वेगळ्या ऑक्सिजन सिलेंडरची गरज पडत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
गटविकासाधिकारी डॉ.संताजी पाटील यांनी सांगितले की, सध्या या 3 कोव्हिड केअर सेंटरमध्ये जवळपास 300 कोरोना रुग्ण उपचार घेत असून कृत्रिम ऑक्सीजनची टंचाई भासू नये म्हणून आमदार बबनदादा शिंदे व जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी तालुक्यातील तीनही सेंटरमध्ये ऑक्सीजन मशीन उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केले. या मशीनमुळे उपचार करताना मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार राजेश चव्हाण,डॉ. विद्यादेवी तोडेकर,डॉ.शुभम खाडे, डॉ.सागर पाटील,महेश जाधव यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments