महिला व बालकांसाठीच्या योजना अधिक परिणामकरकतेने राबविण्यासाठी ‘महिला व बालविकास भवन’ उपयुक्त ठरेल – ॲड. यशोमती ठाकूर |

राज्यभरात 'महिला व बालविकास भवन' चे उद्घाटन
मुंबई, दि.१५(क.वृ.): महिला व बालविकासासाठीच्या योजना अधिक परिणामकारकतेने आणि समन्वयाने राबविता याव्यात या दृष्टिकोनातून राज्यभरात सर्व जिल्ह्यात 'महिला व बालविकास भवन' उपयुक्त ठरतील, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
राज्यात आज सर्व जिल्हा परिषदांमधील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयांमध्ये प्राथमिक स्वरूपात महिला व बालविकास भवनची सुरुवात करण्यात आली. अमरावती येथे ॲड. ठाकूर यांच्याहस्ते महिला व बालविकास भवनचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर याबाबतची माहिती त्यांनी दिली.
मंत्री ॲड. ठाकूर पुढे म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी अर्थसंकल्पातील भरीव तरतुदीसह सगळ्याच पातळ्यांवर शासनाकडून सर्वंकष प्रयत्न होत आहेत.
महिला व बालविकासासाठी योजना राबवणारी सर्व कार्यालये एकाच छताखाली असावीत म्हणून राज्यभरात जिल्हा 'महिला व बालविकास भवन' उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्याचीच प्राथमिक सुरुवात म्हणून सध्या जिल्हा पारिषद इमारतीत असलेल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या कार्यालयात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि राज्य महिला आयोग यांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी बसणार आहे. त्यामुळे महिला आणि बालकांसाठीच्या योजनांबाबत वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागण्याची गैरसोय टाळली जाऊन एकाच ठिकाणी सर्व माहिती आणि सेवा उपलब्ध होणार आहे.
अमरावती येथे ॲड. ठाकूर यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी आमदार सुलभाताई खोडके, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, महिला व बालविकास सभापती पूजाताई आमले आदी उपस्थित होते.
0 Comments