Hot Posts

6/recent/ticker-posts

‘पालकमंत्री उद्यमी ग्राम योजने’द्वारे ग्रामीण भागात उद्योगाला चालना- पालकमंत्री

‘पालकमंत्री उद्यमी ग्राम योजने’द्वारे ग्रामीण भागात उद्योगाला चालना- पालकमंत्री


अकोला,दि.२४(क. वृ.):- ग्रामीण भागात छोटे उद्योग निर्माण करुन रोजगार निर्मिती करण्यासाठी जिल्ह्यात पालकमंत्री उद्यमी ग्राम योजना राबविण्यात येणार असून  त्याद्वारे ग्रामीण भागात उद्योगाला चालना देऊ,असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बाल विकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण व कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्हा पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ  बच्चू  कडू यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पालकमंत्री उद्यमी ग्राम योजना याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम,  कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विकास विभागाचे सु. रा. झळके, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक तराणीया, निवासी उप जिल्हाधिकारी संजय खडसे यांची उपस्थिती होती.
या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील तीन गावांची निवड करण्यात येणार आहे. या गावांमध्ये छोटे-छोटे उद्योग उभारण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांना प्रशिक्षण व माहिती देण्यात येणार आहे. चांगल्या भावनेतून केलेले कार्यातून कुटीर उद्योग शेतीला पुरक व्यवसाय म्हणून गाव उद्योग पूरक गाव होवू शकते. यासाठी समर्पित भावना जिद्द व मेहनत करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री श्री. कडू यांनी सांगितले. दहा-वीस गावांना जोडून बहू उद्देशीय केंद्र तयार करता येवू शकते.
कोरोना संकटामुळे शहरातून गावाकडे आलेल्या कुशल कामगारांचा उपयोग करुन गावात उद्योग उभारणे शक्य आहे. यासाठी गावातील लोकांनी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगीतले. यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. यासाठी विविध विभागाच्या योजनांची सांगड घालून सुक्ष्म नियोजन करुन पालकमंत्री उद्यमी ग्राम योजना सफल होवू शकते असेही ते म्हणाले. यासाठी बँकांनी कर्ज पुरवठा प्रकरणे त्वरीत मार्गी लावणे आवश्यक  असल्याचे त्यांनी सांगीतले.
ही योजना यशस्वी करण्यासाठी विदेशातून आलेले उद्योजक व पुणे, मुंबई येथून आलेले उद्योजक यांच्याशी संवाद साधून त्यांच्यासोबत विचारविनिमय करण्यात येईल असेही त्यांनी सांगीतले. बोरगाव मंजु येथील अगरबत्ती उद्योजक विजय रायबोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments