Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोना मुकाबल्‍यासाठी नियोजन


कोरोना मुकाबल्‍यासाठी नियोजन


पुणे(क.वृ.) :पुणे शहरात  ९ मार्च २०२० ला प्रथम रुग्ण मिळाल्‍यानंतर जिल्‍ह्यातील यंत्रणा सतर्क झाली होती. पुण्‍यामध्‍ये रुग्‍ण वाढत असताना ग्रामीण भागात १६ एप्रिलपर्यंत फक्‍त २० रुग्‍ण होते. ३ मे आणि १७ मे रोजी टाळेबंदी (लॉकडाऊन) शिथील झाल्‍यानंतर ग्रामीण भागात मुंबई आणि पुणे तसेच इतर रेड झोनमधून लोकांचे स्‍थलांतर झाले. ग्रामीण भागात स्‍थलां‍तरित झालेल्‍या व्‍यक्‍तींमध्‍ये कोरोना संसर्ग आढळून आला आणि त्‍यामुळे रुग्‍णसंख्‍या वाढली.

ग्रामीण भागाची स्थिती लक्षात घेवून प्रतिबंधित क्षेत्रात विविध उपाय योजण्‍यात आले. जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम मार्गदर्शनाखाली जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी दैनंदिन सर्वेक्षणाचा निर्णय घेतला. आशा स्‍वयंसेविकांमार्फत प्रत्‍येकी दररोज ५० गृहभेटी सुरु करण्‍यात आल्‍या. आरोग्‍य कर्मचारी आणि खाजगी डॉक्‍टरांमार्फत खाजगी केमिस्‍ट सर्वेक्षण आणि संशयित रुग्‍णांची नोंद करण्‍यात येवू लागली. वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत खाजगी रुग्‍णालयांना भेटी देवून संशयित रुग्‍णांची नोंद व पाठपुरावा सुरु करण्‍यात आला. इतर ठिकाणांहून म्‍हणजे परदेशातून आणि रेडझोनमधून प्रवास करुन आलेल्‍या व्‍यक्‍तींवर विशेष लक्ष ठेवून त्‍याबाबतची नोंद आणि पाठपुरावा करण्‍यात आला. अतिजोखीम व सहव्‍याधी असलेल्‍या सर्व व्‍यक्‍तींचे नियमित सर्वेक्षण करण्‍यात येत आहे. ज्‍येष्‍ठ नागरिक व गरोदर मातांचे  विशेष सर्वेक्षण केले जात आहे.
जिल्‍ह्यांच्‍या सीमांवर २० ठिकाणी आरोग्‍य तपासणी नाक्‍यांची उभारणी करण्‍यात आली असून तपासणी करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीची रजिस्‍टरमध्‍ये नोंद घेण्‍यात आली आहे. आतापर्यंत २० लक्ष लोकांची तपासणी करण्‍यात आली आहे. कोरोना विशेष नियंत्रण कक्षाद्वारे ३७ हजारांहून अधिक कॉल्‍स हे कोरोना समन्‍वयासाठी झालेले आहेत. पुणे ग्रामीण भागात २६ जूनपर्यंत एकूण ८११ रुग्‍ण होते त्‍यापैकी ५०८ बरे झालेले तर २७० एकूण क्रियाशील रुग्‍ण आहेत. ३३ रुग्‍णांचा मृत्‍यू झालेला आहे. पुणे ग्रामीण भागातील रुग्‍ण बरे होण्‍याचे प्रमाण ६२.६३ टक्‍के तर ग्रामीण भागातील मृत्‍यूचे प्रमाण ४.०६ टक्‍के इतके आहे. जिल्‍ह्यातील ९ लक्ष ३४ हजार ५३८ कुटुंबांचे ‘आशा सर्वेक्षण’ करण्‍यात आले असून त्‍यामध्‍ये फीवर क्लिनीक एकूण बाह्यरुग्‍ण संख्‍या २ लक्ष ८९ हजार ६९० तर सर्दी, ताप, खोकला इतर रुग्‍ण ११ हजार २०६ होते. संदर्भित केलेल्‍या रुग्‍णांची संख्‍या ६९६ इतकी होती.  अतिजोखमीच्‍या व्‍यक्‍तींना शिक्‍के मारुन घरी विलगीकरण करण्‍यात आले. विलगीकरण झालेल्‍या व्‍यक्‍तींवर आशा व ग्रामपंचायतीमार्फत विशेष लक्ष ठेवण्‍यात आले.
पुणे ग्रामीण जिल्‍ह्यात एकूण ३३०६ प्रतिबंधात्‍मक क्षेत्रांपैकी १७३ क्षेत्रात यशस्‍वी कार्यवाही पूर्ण झाली. उरलेल्‍या १३३ क्रियाशील क्षेत्रामध्‍ये ३०५५ पथके कार्यरत आहेत. एका पथकाकडून दररोज ५० ते १०० घरांचे सर्वेक्षण केले जात असून आतापर्यंत ११ लक्ष ४३ हजार २१५ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. १४१ बाधित ग्रामपंचायत आणि ११ बाधित नगरपालिकांमध्‍ये झालेल्‍या सर्वेक्षणामध्‍ये २६९९ अतिजोखीम संपर्क असलेले आणि ४९१४ कमी जोखीम संपर्क असलेले होते. प्रत्‍येक पथकाकडे थर्मल गन व पल्‍स ऑक्‍सीमीटर असून ‘सारी’ रुग्‍णांचा शोध घेतला जातो. लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी होते. शेवटचा रुग्‍ण आढळल्‍यापासून १४ दिवसांपर्यंत सर्वेक्षण चालते. बाधित रुग्णाच्‍या संपर्कातील एकूण ३४५ केसेस ह्या सर्वेक्षण उपक्रमाच्‍या मदतीने शोधून काढण्‍यात आलेल्‍या आहेत. सहव्‍याधी सर्वेक्षणामध्‍ये (कोमॉर्बिड सर्वेक्षण) ग्रामीण भागात ६० वर्षांवरील ६ लक्ष २८ हजार ३६ तर इतर व्‍याधी असलेल्‍या व्‍यक्‍ती २ लक्ष ९ हजार ३० आढळून आल्‍या.
समर्पित कोविड रुग्‍णालये ५ कार्यान्वित असून ११३० खाटा, ११७ आयसीयू खाटा, ३२ व्‍हेंटीलेटर्स आणि ४९६ ऑक्सिजन खाटांची उपलब्‍धता आहे. समर्पित कोवीड आरोग्‍य केंद्र १९ कार्यान्वित असून १०५४ खाटा, १२४ आयसीयू खाटा, ३६ व्‍हेंटीलेटर्स आणि २९३ ऑक्सिजन खाटा उपलब्‍ध आहेत. ग्रामीण भागात ४८ कोविड केअर सेंटरची स्‍थापन करण्‍यात आली असून ९३९९ खाटांची उपलबधता आहे. अशा प्रकारे एकूण ७२ रुग्‍णालयांची व्‍यवस्‍था असून ११ हजार ५८३ खाटांची उपलब्धता आहे. एकूण २४१ आयसीयू, ६८ व्‍हेंटीलेटर्स व ७८९ ऑक्सिजन खाटांची सोय उपलब्‍ध आहे.
पुणे जिल्‍हा परिषद, जिल्‍हा आरोग्‍य सोसायटी, राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान यांच्‍या मार्फत विप्रो समर्पित कोविड आरोग्‍य केंद्र कार्यान्वित करण्‍यात आले असून मुख्‍यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते 11 जून रोजी हस्‍तांतरण सोहळा संपन्‍न झाला. या केंद्रात ५०४ खाटा, १० आयसीयू खाटा आणि ५ व्‍हेंटीलेटर्सची उपलब्‍धता आहे. म्‍हाळुंगे इंगळे समर्पित कोविड केअर सेंटर सुध्‍दा पुणे जिल्‍हा परिषद, जिल्‍हा आरोग्‍य सोसायटी, राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान यांच्‍या मार्फत कार्यानिव्‍त करण्‍यात आले असून येथे १४०० खाटांची सोय उपलब्‍ध आहे. संशयित व बाधित रुग्णांसाठी येथे वेगळी व्‍यवस्‍था आहे. म्‍हाडा इमारतीच्‍या सदनिकेमध्‍ये स्‍वतंत्र सोय आहे. हा सदनिका परिसर लोकवस्‍तीपासून दूर असून रुग्‍णाकडून स्‍थानिक जनतेकरिता संसर्गाचा धोका नाही. खासदार डॉ. अमोल कोल्‍हे यांच्‍या हस्‍ते १५ मे रोजी हस्‍तांतरण सोहळा संपन्‍न झाला. याशिवाय उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्‍या हस्‍ते 20 जून रोजी रोगप्रतिकारकशक्‍ती वाढीसाठी व्‍हीटॅमिन डी, सी, झिंक गोळ्या, आर्सेनिक ३० आणि आयुर्वेदीक प्रातिनिधीक स्‍वरुपात वाटप करण्‍यात आले.
पुणे ग्रामीण कोरोनाबाधित रुग्‍णांकरिता भविष्‍यातील नियोजन करण्‍यात आले आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वाढती रुग्‍णसंख्‍या लक्षात घेता ग्रामीण भागातील रुग्‍ण पुणे शहराबाहेर उपचारास ठेवण्‍याकरीता तालुकास्‍तरीय कोविड केअर सेंटर (सीसीसी) कार्यान्वित करणे आवश्‍यक आहे.  केंद्र शासन आणि राज्‍य शासनाकडील सुधारित मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करुन बाधित रुग्‍णाला जवळच्‍या कोविड रुग्‍णालयात उपचारासाठी  ठेवणे आवश्‍यक आहे. सद्यस्थितीत विप्रो हॉस्‍पीटल (५०४ खाटा, १० आयसीयू खाटा), नवले हॉस्‍पीटल (१०० खाटा, २० आयसीयू खाटा) येथे समर्पित कोविड उपचार केंद्र असून नवले हॉस्‍पीटल येथे अधिक १०० खाटांची उभारणी करणे आवश्‍यक आहे. भविष्‍यातील कोरोनाबाधित रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेता व पुणे शहरावरचा ताण कमी करण्‍याकरिता उप जिल्‍हा रुग्‍णालय बारामती, मंचर आणि भोर येथे ५० खाटांचे समर्पित कोविड रुग्‍णालय तात्‍काळ सुरु करणे आवश्‍यक आहे. औंध येथील जिल्‍हा रुग्‍णालयात ग्रामीण रुग्‍णांकरिता अधिक १०० खाटांची सोय तात्‍काळ करणे आवश्‍यक आहे. ससून रुग्‍णालय, ग्रामीण रुग्‍णालय, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांना कोरोना प्रतिबंधाकरिता आवश्‍यक उपाययोजना करण्‍यासाठी जिल्‍हा वार्षिक नियोजनातून एकूण ६५.७८ कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे.
कोरोना बाधितांवर उपचाराबरोबरच माहिती-शिक्षण-संवाद उपक्रमाचाही वापर करण्‍यात येत आहे. यामध्‍ये २७०० बॅनर्स, १४ हजार ३३६ पोस्‍टर्सद्वारे प्रसिध्‍दी करण्‍यात आली. ६ लक्ष माहितीपत्रके वाटण्‍यात आली. सोशल मिडीयावरुन व्हिडीओ फील्‍म्‍स, ऑडिओ क्लिप्स प्रसारित करण्‍यात आल्‍या. एलइडी वाहनाद्वारेही प्रचार करण्‍यात आला.
पुणे जिल्‍हा परिषदेच्‍यावतीने महाराष्‍ट्र नॉलेज कार्पोरेशनच्‍या (एमकेसीएल) सहकार्यातून इंटीग्रेटेड डीसीज सर्वेलन्‍स प्रोग्राम (आयडीएसपी) समर्पित वेबपोर्टल १२ मार्चपासून संपूर्ण जिल्‍ह्यासाठी कार्यरत आहे. जिल्‍ह्यातील ६८ संनियंत्रित अधिकाऱ्यांची टीम या वेबपोर्टलचा प्रभावी वापर करीत आहे. यावर १०९४ हून अधिक डॉक्‍टरांची नोंदणी तसेच १ लक्ष ४३ हजारांहून अधिक नागरिकांच्‍या होम क्‍वारंटाईनचे यशस्‍वी व्‍यवस्‍थापन करण्‍यात आले आहे.
 ‘पुनश्‍च हरि ओम’ म्‍हणजेच ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत टाळेबंदी (लॉकडाऊन) हळूहळू उठवण्‍यात येत आहे.  तथापि, कोरोनाचा धोका संपलेला नाही, हेही नागरिकांनी यानिमित्‍ताने लक्षात घेणे आवश्‍यक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखणे अवघड नाही, मात्र त्‍यासाठी वैयक्तिक दक्षता आणि काळजी घेतली पाहिजे.
Reactions

Post a Comment

0 Comments