शेतकऱ्यांना कृषीमाल अत्यावश्यक वाहतूक सेवेतंर्गत शहरात नेण्याची मुभा ; कृषी अधिकारी दत्तात्रय येळे व जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी दिली माहिती
माढा/प्रतिनिधी- सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर दुसरीकडे मोठ्या शहरात भाजीपाला व फळे यांची टंचाई जाणवत असल्यामुळे यावर ठोस उपाययोजना म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी 6 एप्रिल रोजी व पोलीस अधीक्षक यांनी एका विशेष परिपत्रकाद्वारे कृषीमाल अत्यावश्यक सेवेत येत असल्याने शेतकऱ्यांना तो वाहनातून मोठ्या शहराकडे विक्रीस नेण्याची मुभा असल्याची माहिती माढ्याचे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय येळे व जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी दिली आहे.
एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळे पडून आहेत त्यांना ग्राहक उपलब्ध नाही तर दुसरीकडे पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरात याची टंचाई जाणवत असून व्यापारी चढ्या दराने उपलब्ध माल विकत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी व्यापाऱ्यांनाच फायदा होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थेट माल शहरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी होत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सर्व प्रकारच्या पालेभाज्या व फळे यासह इतर शेतीमाल, पशुखाद्य,शेती उत्पादने, खते,बी-बियाणे,कीटकनाशके आणि इतर जीवनावश्यक वस्तू आयात-निर्यात करणा-या यंत्रणेस संचारबंदी मधून वगळण्यात आले असून या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना डिझेल व पेट्रोल देणेबाबत परिपत्रकात स्पष्ट उल्लेख केलेला आहे.परंतु अत्यावश्यक शेतीमालाची वाहतूक करताना एका वाहनात 4 पेक्षा अधिक लोक प्रवास करणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच सामाजिक अंतर पाळावे प्रत्येक व्यक्तीने तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा तसेच वेळोवेळी हात धुण्यासाठी साबण, हॅन्डवॉश व सेनीटायझरचा वापर करावा तसेच शासनाच्या विविध नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
शेतीमालाची वाहतूक करताना शेतकऱ्यांनी आपापल्या वाहनावर "अत्यावश्यक सेवा वाहतूक" बोर्ड समोरच्या बाजूला लावून त्याखाली जीवनावश्यक फळे व भाजीपाला असाही उल्लेख करावा.अशी वाहने भारतात कोठेही वस्तू ने-आण करण्यासाठी प्रवास करू शकतात त्यांना पासेसची आवश्यकता लागणार नाही परंतु या वाहनातून अवैद्य प्रवासी वाहतूक करता येणार नाही.

0 Comments